औरंगाबादच्या शिरपेचात आणखी एक तुरा, ‘औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’टॉप टेनमध्ये

AIFF
AIFF

औरंगाबाद : ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’ने जाहीर केलेल्या देशातील अधिकृत व नामांकित फिल्म फेस्टिव्हलच्या यादीत ‘औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ने राष्ट्रीय पातळीवर टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे. ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’ने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरही ही माहिती अपलोड केल्याचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव नीलेश राऊत यांनी सांगितले.
‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’चे ज्यूरी, अधिकारी यांनी मागच्या वर्षी फेस्टिव्हलला उपस्थिती लावली होती. त्यांनी त्यावेळी सात वर्षांच्या अहवालाचा अभ्यास केला. त्यानंतर फेस्टिव्हल्सची आज क्रमवारी जाहीर झाली. यात टॉप टेनमध्ये नवव्या क्रमांकाचे नामांकन ‘औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ला मिळाले आहे.

अनेकांचा मोठा वाटा
‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’ ही सर्व फिल्म सोसायटीची शिखर संस्था आहे. भारतात निम्म्याहून अधिक ठिकाणी या फिल्म सोसायटीच्या माध्यमातून फिल्म फेस्टिव्हल होतात. या शिखर संस्थेने ‘औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ला नामांकन दिले आहे. या फेस्टिव्हलची यापुढे जागतिक पातळीवरही दखल घेतली जाईल, असे नीलेश राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘नाथ ग्रुपचे नंदकिशोर कागलीवाल, सतीश कागलीवाल यांनी या फेस्टिव्हल्सची मुहूर्तमेढ रोवली. त्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानही सुरुवातीपासून या कार्यात सहभागी होते. एमजीएमचे अंकुशराव कदम यांनी या फेस्टिव्हल्सला मोठे पाठबळ दिले.

त्यामुळे या फेस्टिव्हलचे स्वरूप कागलीवाल यांच्या साथीने मोठे करता आले. महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी व संचालक अशोक राणे यांनी हा महोत्सव मोठा करण्यात, जागतिक पातळीसाठी मोलाचा वाटा उचलला. स्थानिक पातळीवर शिव कदम, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटिंग, मंगेश मर्ढेकर, सुबोध जाधव यांनी तळागाळापर्यंत हा फेस्टिव्हल कसा पोचवता येईल यासाठी प्रयत्न केले. शंभराहून अधिक जणांचा आयोजन समितीत सहभाग असून हे यश त्यांचेही आहे. सर्व औरंगाबादकरांसह मराठवाड्यातील जनतेने या फेस्टिव्हलला प्रचंड प्रतिसाद दिला नसता तर हे मोठे स्वरूप आले नसते.

हा औरंगाबादकरांचा फेस्टिव्हल
स्थानिक रसिकांची मोठी संख्या हीच जमेची बाजू आहे. इतर ठिकाणी फेस्टिव्हलमध्ये बाहेरून लोक जास्त येतात. औरंगाबाद-वेरूळ महोत्सव रद्द झाल्यानंतर औरंगाबादकरांचा स्वतःचा महोत्सव राहिला नव्हता. ही उणीव या फेस्टिव्हलने भरून काढली. हा फेस्टिव्हल आता कुण्या संस्थेचा राहिला नसून तो औरंगाबादकरांचा असल्याचेही राऊत म्हणाले.

Edited - Ganesh Pitekar
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com