
मानधन मिळावे या मागणीसाठी दिव्यांगांनी महापौर, आयुक्तांची वाहने अडविली. त्यामुळे दोघांना रिक्षातून घरी जावे लागले.
औरंगाबाद-महापालिकेतर्फे दिव्यांगांना मानधन देण्यात यावे या मागणीसाठी कॉंग्रेसच्या अपंग सेलतर्फे गुरुवारी (ता. सहा) ठिय्या आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांनी महापौर, आयुक्तांची वाहने अडविली. त्यामुळे दोघांना रिक्षातून घरी जावे लागले.
दिव्यांगांच्या कल्याणासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पातून पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने या निधीतून दिव्यांगांना प्रत्येक महिन्याला मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अनेकांना मानधन सुरूही करण्यात आले; मात्र उर्वरित दिव्यांग काही महिन्यांपासून महापालिकेत खेट्या मारत आहेत. वारंवार मागणी केल्यानंतरही मानधन सुरू होत नसल्यामुळे कॉंग्रेसच्या अपंग सेलतर्फे गुरुवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दोन किलो साखर किंवा अर्धा किलो चिकन फ्री, कुठे ते वाचा
जिल्हाध्यक्ष अब्दुल मुदस्सर अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांनी महापालिकेचे दोन्ही रस्ते अडवून धरले. याचा फटका सर्वसाधारण सभा संपल्यानंतर घरी जाणाऱ्या महापौर व आयुक्तांना बसला. आयुक्त आस्तिककुमार पांडेय, महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिव्यांगांसोबत चर्चा केली; मात्र त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे दोघांना आपल्या गाड्या महापालिकेत ठेवून रिक्षाने घरी जाणे पसंत केले. दरम्यान, शहराच्या विविध भागांतून आलेल्या दिव्यांगांनी सायंकाळपर्यंत महापालिकेत ठिय्या दिला होता.
आयुक्तांच्या आक्षेपावर संताप
महापालिका आयुक्तांनी अनेक दिव्यांग बोगस असल्याची शंका उपस्थित करत त्यांच्या प्रमाणपत्राची डॉल्ट्रामार्फत चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या चौकशीसाठी गेलेल्या दिव्यांगांना प्रमाणपत्राची फेरतपासणी करता येत नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही जायचे कुठे? असा प्रश्न यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला.
हेही वाचा : निकम साहेब.. हे जेवण मीच बनवलेय ना!