या कारणामुळे महापालिकेने केला दंड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

आठ दिवसांपूर्वीच शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी जाळीचे आच्छादन लावूनच बांधकाम करावे, असे आवाहन केले होते. मात्र त्यानंतरही मालमत्ताधारकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे शुक्रवारी (ता.17) समोर आले.

औरंगाबाद- बांधकाम करताना आच्छादनाचा वापर करावा, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. त्यानंतरही अनेकांनी बांधकामे जाळी न लावताच सुरू केली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने दोन बांधकामधारकांना शुक्रवारी (ता. 17) दंड लावत धक्का दिला. 

शहरातील हवेचे प्रदूषण धोकादायकरीत्या वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकास्तरावर प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे बांधकामासाठीची खडी, वाळू, विटा रस्त्यावरच साठविले जाते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो तर दुसरीकडे बांधकामामुळे निघणारी धूळ प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. या विरोधात महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला. आठ दिवसांपूर्वीच शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी जाळीचे आच्छादन लावूनच बांधकाम करावे, असे आवाहन केले होते.

हेही वाचा - 

...तर संजय राऊतांचं तोंड वंगणानं काळं करू

मात्र त्यानंतरही मालमत्ताधारकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे शुक्रवारी (ता.17) समोर आले. रेल्वेस्टेशन परिसरात गोळेगावकर कॉलनीत बांधकाम जाळीचे अच्छादन न लावताच सुरू होते. बांधकामाचे साहित्यही परिसरात पडलेले होते. त्यामुळे वॉर्डअधिकारी एस. आर. जरारे यांच्या पथकाने अरिहंत प्रॉपर्टीज यांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. उस्मानपुरा येथेही अशाच प्रकारे सुरेश मालचंद सेठिया यांचे बांधकाम सुरू होते. त्यांनाही पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. 
 
विद्रुपीकरण करणाऱ्या एजन्सीवर गुन्हा 
दुभाजकाचे विद्रुपीकरण करणाऱ्या जाहिरात एजन्सीला देखील महापालिकेने दणका दिला आहे. सिडको एन-3 परिसरातील रस्त्यावर महापालिकेने दुभाजक बसवून रंगरंगोटी केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या दुभाजकावर जाहिरातीचे पोस्टर चिटकविण्यात आले. त्यामुळे वॉर्डअधिकारी मीरा चव्हाण व स्वच्छता निरीक्षक सुनील दाभाडे यांनी माहिती घेतली असता, मयूर कासलीवाल यांनी महापालिकेची परवानगी न घेता पोस्टर चिटकवल्याचे समोर आले. कासलीवाल यांच्याविरोधात पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात शहर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा -आंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत? चला औरंगाबादला! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation News