ब्रिटनहून आलेल्या ३३ जणांवर २८ दिवस औरंगाबाद पालिकेची नजर, दोघांची आरटीपीसीआर चाचणी

माधव इतबारे
Wednesday, 30 December 2020

विदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय महापालिकेने शासनाच्या आदेशानुसार घेतला आहे.

औरंगाबाद : विदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय महापालिकेने शासनाच्या आदेशानुसार घेतला आहे. असे असले तरी यापूर्वीच शहरात आलेल्या व सध्या वास्तव्यास असलेल्या ३३ नागरिकांना घरी राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यावर २८ दिवस महापालिकेतर्फे लक्ष ठेवले जाणार आहे. दरम्यान आणखी दोन जणांची चाचणी करण्यात आली असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी मंगळवारी (ता. २९) सांगितले.

 

 

 

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने संपूर्ण जग सतर्क झाले आहे. राज्य सरकारने देखील सतर्कचे आदेश दिले आहेत. २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची सूचना करत त्यांची यादी महापालिकेला दिली आहे. त्यानुसार प्रशासनातर्फे सर्वेक्षण करून ब्रिटनहून आलेल्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. महिनाभरात ब्रिटन येथून ४७ नागरिक शहरात आले आहेत. यातील एक महिला व एक तरुण पॉझिटिव्ह आढळून आले. तसेच सहा जण ब्रिटनला परत गेले असून, सात जण इतर जिल्ह्यातील आहेत.

 

 

 
 

सध्या ३१ नागरिक शहरात राहत असून, त्यापैकी २९ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दोघांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल बुधवारी (ता. २९) प्राप्त होणार आहे. शहरात राहणाऱ्या ३३ नागरिकांना घरी राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या नागरिकांवर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे २८ दिवसापर्यंत बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे, असे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation Watch On Britain Returnee For 28 Days