आकृतिबंधाचे होणार मंत्र्यांसमोर सादरीकरण, नोकरभरतीसाठी उजाडणार नवीन वर्षे

माधव इतबारे
Sunday, 15 November 2020

औरंगाबाद महापालिकेच्या आकृतिबंधाचे भिजत घोंगडे कायम आहे. आकृतिबंधाला मंजुरी मिळावी यासाठी अधिकाऱ्यांच्या मुंबई वाऱ्या सुरूच असून, आता नगरविकास मंत्र्यासमोर सादरीकरण करण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या आकृतिबंधाचे भिजत घोंगडे कायम आहे. आकृतिबंधाला मंजुरी मिळावी यासाठी अधिकाऱ्यांच्या मुंबई वाऱ्या सुरूच असून, आता नगरविकास मंत्र्यासमोर सादरीकरण करण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली आहे. त्यामुळे नोकर भरतीसाठी महापालिकेला नवीन वर्षाची वाट पाहवी लागणार आहे.
शहराचा वाढता विस्तार व महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या यात मोठी तफावत आहे. अनेक पदे रिक्त असल्याने आहे त्या अधिकाऱ्यांची कामे करताना दमछाक होत आहे. आकृतिबंध मंजूर नसल्याने नोकरभरती करण्यास अडचणी येत आहेत.

Diwali Lakshmi Pujan 2020 : दिव्यांच्या रोषणाईत लक्ष्मीपूजन, झेंडूच्या फुलांच्या तोरणमाळा अन् सप्तरंगी रांगोळ्यांनी सजले अंगण

अनेक वादानंतर सहा महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने त्यात दुरुस्त्या सुचविल्या. त्यानुसार बदलही करण्यात आले. दरम्यान नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेचा आकृतिबंध अंतिम करून तो मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी पाठविला असल्याचे महापालिकेला कळविले होते. दरम्यान या विषयावर नुकतीच नगर विकास विभागात अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यात उपायुक्त सुमंत मोरे यांना नगर विकास मंत्र्यांकडे तुम्हाला आकृतिबंधाचे सादरीकरण करावे लागेल, अशी सूचना करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे दिवाळीनंतर आकृतिबंधाचे सादरीकरण झाल्यास डिसेंबर महिन्यात मंजुरी मिळेल व नव्या वर्षांत नोकर भरतीचा मार्ग मोकळा होईल, अशी शक्यता आहे.

Diwali 2020 : दुसऱ्या दिवशीही झेंडुच्या फुलांचा दर शंभरीवरच, औरंगाबादेत ३८१ क्विंटलची आवक

२०१७ पासून सुरू आहे प्रवास
तत्कालीन महापौर भगवान घडमोडे यांनी १८ जुलै २०१७ च्या सर्वसाधारण सभेत आकृतिबंध व सेवा भरती नियमांचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यावेळी सर्वसाधारण सभेने ३६ दुरुस्त्या करण्याच्या सूचना केल्या होत्या. या दुरुस्त्या करून आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणे गरजेचे असताना तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक व उपायुक्त मंजूषा मुथा यांनी नवीनच प्रस्ताव तयार करून तो १८ जुलै २०१९ च्या सभेत आणला. त्यावर माजी नगरसेवक समीर राजूरकर यांच्यासह अधिकारी संघटनेने आक्षेप घेतला व जुना प्रस्तावच शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation Will Wait For Recruitment In New Year