नऊ मार्चला प्रसिद्ध होणार प्रारूप मतदारयाद्या

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

नऊ मार्चला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केल्या जाणार असून, त्यावर आक्षेप घेण्यासाठी आठ दिवसांचा म्हणजेच १६ मार्चपर्यंतचा अवधी दिला जाणार आहे. २३ मार्चला अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ३१ जानेवारीची मतदारयादी गृहीत धरण्याचे आदेश यापूर्वीच आयोगाने दिले आहेत. 

औरंगाबाद- महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी वॉर्डरचना अंतिम केल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मतदारयाद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम महापालिकेला आखून दिले आहे. त्यानुसार नऊ मार्चला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केल्या जाणार असून, त्यावर आक्षेप घेण्यासाठी आठ दिवसांचा म्हणजेच १६ मार्चपर्यंतचा अवधी दिला जाणार आहे. २३ मार्चला अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ३१ जानेवारीची मतदारयादी गृहीत धरण्याचे आदेश यापूर्वीच आयोगाने दिले आहेत. 

ठळक बातमी : दीड महिन्यात वीस कोटीच्या नियोजनाचे आव्हान 

महापालिकेची एप्रिल महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू असून, तीन फेब्रुवारीला आरक्षण सोडत काढण्यात आल्यानंतर प्रारूप वॉर्डरचना तयार करण्यात आली होती. त्यावर सुमारे ३७० आक्षेप घेण्यात आले. दरम्यान, १५ फेब्रुवारीला या आक्षेपांवर सुनावणी घेण्यात आली व सोमवारी (ता. २४) वॉर्डरचना अंतिम करण्यात आली. आता त्यापुढील म्हणजेच मतदारयाद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने ठरवून दिला आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीच्या मतदारयाद्या महापालिका वार्डनिहाय फोडल्या जाणार आहेत. या प्रारूप याद्या नऊ मार्चला प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर नऊ मार्च ते १६ मार्च अशी वेळ आक्षेप दाखल करण्यासाठी देण्यात आली आहे. आक्षेप सुनावणीनंतर २३ मार्चला अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जातील, असे आदेश निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. 
 
नवीन मतदारांना मिळणार नाही हक्क 
सध्या नवीन मतदारांची नोंदणी सुरू आहे. महापालिका निवडणुकीच या मतदारांचा आपल्याला उपयोग होईल, म्हणून अनेक इच्छुक मतदार नोंदणी करून घेत आहेत; मात्र निवडणूक आयोगाने ३१ जानेवारीपर्यंतच्या मतदारयाद्या गृहीत धरण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे जानेवारीनंतर नोंदणी झालेल्या नवमतदारांना महापालिका निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार नसल्याचे सिद्ध झाले आहे; मात्र आयोग ऐनवेळी ही मुदत वाढवू शकतो, अशीही चर्चा सुरू आहे. 

क्‍लिक करा : महापालिका निवडणुक : बदल किरकोळ, गडबडी कायम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Election