विकासकामांच्या एमबीला फुटले पाय!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कामांच्या एमबी नसतील तर संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. थकीत बिले देण्यासाठी प्राधान्यक्रम ठरविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

औरंगाबाद- महापालिकेने गेल्या तीन-चार वर्षांत केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या एमबी (मेजरमेंट बुक) गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कनिष्ठ अभियंत्यासह अन्य जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. 

महापालिकेतर्फे शहरात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली जातात. तिजोरीत खडखडाट असताना अनेक नगरसेवक वशिलेबाजी करीत कंत्राटदाराकडून कामे करून घेतात. मात्र बिले देताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहेत. सध्या सुमारे 250 कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. थकीत बिले मिळावीत, या मागणीसाठी कंत्राटदारांनी महापालिकेसमोर उपोषण केले होते. त्यामुळे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी जानेवारीपासून बिलांचे वाटप केले जाईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी या कामांची चौकशी पालक अधिकाऱ्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला. वारंवार सूचना करूनदेखील पालक अधिकाऱ्यांनी अद्याप अंतिम अहवाल दिलेला नाही.

हेही वाचा : कोणाच्या"कृपे'ने औरंगाबाद शहराचा झाला कचरा

यासंदर्भात विचारणा केली असता, आयुक्त आस्तिककुमार पांडेय म्हणाले, की अनेक कामांच्या एमबी गायब असल्याचे समोर येत आहे. विकासकामांच्या एमबी या नियमानुसार महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याच्या ताब्यात असणे गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत कामांच्या एमबी नसतील तर संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. थकीत बिले देण्यासाठी प्राधान्यक्रम ठरविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
लेखा विभागात फाइल गायब 
कामांच्या एमबी नसल्यामुळे अनेक कामे बोगस झाली असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. बोगस कामांच्या फाइल संबंधित विभागात कधीच ठेवण्यात येत नाहीत. कंत्राटदार या फाइल थेट घरी घेऊन जातात. भविष्यात चौकशीचा मुद्दा आला तरी फाइल सापडू नये, हा त्यामागचा "शुद्ध' हेतू असतो. लेखा विभागात त्या कामाची निव्वळ "सीसी' असते. या सीसीवरून चौकशी करता येत नाही. अशा गायब झालेल्या फाइल परत येणार नाहीत. ज्या सीसीच्या फाइल आल्या नाहीत किंवा सापडल्या नाहीत ती कामे बोगस आहेत, असे निष्पन्न होणार आहे. 

क्लिक करा : मंदी संपताच बजाज ऑटोचा होणार विस्तार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal News