हातगाड्या पळाल्या, तुटली व्यापाऱ्यांची दुकाने

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 March 2020

औरंगाबाद : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, औरंगपुरा, टिळक पथ, पैठण गेट, कुंभारवाडा, मछली खडक भागातील रस्ते हातगाडी, अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय मंगळवारी (ता. तीन) रस्त्यावर उतरले; मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी सतर्क केल्यामुळे हातगाडीचालक पळाले व महापालिकेने कुंभारवाड्यात रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली. सायंकाळपर्यंत १२५ ते १५० छोटी-मोठी अतिक्रणे तर काही पक्की बांधकामे हटविण्यात आल्याने कुंभारवाड्यातील रस्ते मोकळे झाले आहेत. 

औरंगाबाद : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, औरंगपुरा, टिळक पथ, पैठण गेट, कुंभारवाडा, मछली खडक भागातील रस्ते हातगाडी, अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय मंगळवारी (ता. तीन) रस्त्यावर उतरले; मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी सतर्क केल्यामुळे हातगाडीचालक पळाले व महापालिकेने कुंभारवाड्यात रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली. सायंकाळपर्यंत १२५ ते १५० छोटी-मोठी अतिक्रणे तर काही पक्की बांधकामे हटविण्यात आल्याने कुंभारवाड्यातील रस्ते मोकळे झाले आहेत. 

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, औरंगपुरा, टिळक पथ, पैठण गेट, कुंभारवाडा, मछली खडक, सराफा, शहागंज भागाला हातगाड्यांचा विळखा पडला आहे. रस्ते अरुंद असताना त्यात व्यापाऱ्यांनी पाच-सात फुटांपर्यंत तर त्यापुढे हातगाडी चालकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात तर नागरिकांना पायी चालणेही अवघड होत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेऊन हातगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. महापालिकेने कारवाई केली नाही तर बंद पाळण्याचा इशारा पैठण गेट-टिळक पथ येथील व्यापाऱ्यांनी दिला होता.

हे ही वाचा मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच  

व्यापाऱ्यांनी पोलिस आयुक्तांचीदेखील भेट घेतली होती. त्यानुसार मंगळवारी पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्तांनी संयुक्त पाहणी ठेवली होती. त्यानुसार सकाळी ११.४५ वाजता महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय गुलमंडीवर आले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्यासह अजय शहा, लक्ष्मीनारायण राठी, आदेशपालसिंग छाबडा यांच्यासह इतर व्यापाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन कैफियत मांडली. हातगाड्यांमुळे आम्हाला व्यवसाय करणे अवघड झाले आहे, असे सांगत पुरावे म्हणून छायाचित्र आयुक्तांना दिले. त्यानंतर आयुक्तांनी कुंभारवाड्याकडे मार्चा वळविला. या ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर पत्र्याचे शेड करून पाच ते दहा फुटांपर्यंत रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख उपायुक्त रवींद्र निकम यांना रस्त्यावर आलेला दुकानाचा भाग जेसीबी लावून पाडण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोन जेसीबी लावून १२५ ते १५० छोटे-मोठे अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी फोनचे खांबही पाडण्यात आले. दरम्यान, पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्तांनी कुंभारवाड्यापासून पैठण गेटपर्यंत रस्त्याची पाहणी केली. 

पोलिसांनी केले सतर्क 
महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त पाहणीसाठी येणार असल्यामुळे सकाळीच वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर फिरून हातगाडीचालकांना सतर्क केले. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांसह ताफा येईपर्यंत हातगाडी चालकांनी रस्ता मोकळा केला होता. व्यापाऱ्यांनी ही बाब पोलिस व महापालिका आयुक्तांच्या कानावर टाकली. पैठण गेट-टिळक पथ भागातील व्यापाऱ्यांच्या तक्रारी असताना कारवाई मात्र कुंभारवाडा भागात झाली. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी ‘हातगाड्या तर पळून गेल्या; पण आमची दुकाने तुटली,’ अशा शब्दांत संताप व्यक्त केला. 

‘एक्स’ व्यक्तीला रोज पाच हजारांचा हप्ता 
या भागातील हातगाडीचालक, रस्त्यावर दुकाने थाटणाऱ्यांचे थेट संबंध असून, ‘एक्स’ व्यक्तीला रोज पाच हजार रुपयांचा हप्ता जातो, असा आरोप एका व्यापाऱ्याने आयुक्तांची भेट घेऊन केला. आयुक्तांनी मात्र त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पोलिसांनी त्या व्यापाऱ्याला दूर केले. 
 
वर्षभरात सर्वांचा दुश्मन बनेल... 
मुख्य बाजारपेठेतील रस्ते मोकळे करण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही व्यापारी रस्त्यावर येतात. वारंवार तंबी दिल्यानंतरही अतिक्रमण केले जात असल्यामुळे व्यापाऱ्यांच्या सामानाचे नुकसान केले, असे महापालिका आयुक्तांनी सांगितले. अशाच कारवाया होत राहिल्या तर वर्षभरात या शहरातील सर्वांचा दुश्मन बनेल, असेही आयुक्त म्हणाले.

हेही वाचातुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal News