लग्नाची हाैस यांना पडली भारी,,,

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

गुरुवारी (ता. १९) सिल्लेखाना येथील बागवान शादीखाना येथे कार्यक्रम घेण्यात आला. हा प्रकार महापालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत समोर आला. त्यामुळे शादीखाना व्यवस्थापनास शुक्रवारी (ता. २०) सात हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 

औरंगाबाद : कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून शहरातील सर्व मंगल कार्यालये, शादीखाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी काढले आहेत. असे असताना गुरुवारी (ता. १९) सिल्लेखाना येथील बागवान शादीखाना येथे कार्यक्रम घेण्यात आला. हा प्रकार महापालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत समोर आला. त्यामुळे शादीखाना व्यवस्थापनास शुक्रवारी (ता. २०) सात हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. गर्दी होऊ नये म्हणून सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत; तर सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील चित्रपटगृह, मॉल, जीम, मंगल कार्यालये, शादीखानेही ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले; मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे. गुरुवारी (ता. १९) शहरातील अनेक मंगल कार्यालये, शादीखान्यांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. त्यामुळे आयुक्तांनी मंगल कार्यालये, शादीखान्यांची तपासणी करण्याचे आदेश वॉर्ड अधिकाऱ्यांना दिले आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यानुसार सिल्लेखाना येथील बागवान शादीखाना गुरुवारी सुरूच असल्याचे समोर आले. याठिकाणी कार्यक्रमही घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी वॉर्ड क्रमांक-दोनच्या पथकाच्या तपासणीत हा प्रकार समोर आला. त्यामुळे पथकाने बागवान शादीखान्यावर दंडात्मक कारवाई करीत सात हजारांचा दंड वसूल केला. वॉर्ड अधिकारी प्रकाश आठवले यांच्या आदेशानुसार स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ, विकास मोहोडे, सय्यद कलीम, नागरिक मित्र पथकाचे राजेंद्र गाढवे यांनी ही कारवाई केली. 

इतर भागात तपासणी सुरू 
नागरिकांना वारंवार आवाहन करूनही लग्नसमारंभाचे आयोजन केले जात असल्यामुळे यापुढे कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. गुरुवारी शहरातील काही भागातील मंगल कार्यालय सुरू होते; मात्र त्यानुसार वॉर्ड कार्यालयांचे पथक तपासणी करीत आहे. दरम्यान, ज्यांना लग्नसमारंभ पुढे ढकलणे शक्य नाही त्यांनी किमान ५० लोकांनाच लग्नसमांरभात येण्याची परवानगी द्यावी, अशी मुभा महापालिकेने दिली आहे. गर्दी टाळण्यासाठी नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal News