लॉकडाउनमध्ये बेकायदा प्लॉटिंग ओपन; महापालिकेने केली कारवाई

माधव इतबारे
Friday, 14 August 2020

शहर परिसरात बेकायदा प्लॉटिंगचा व्यवसाय अद्याप तेजीत आहे. हिमायतनगर भागात तर लॉकडाउनमध्ये बेकायदा प्लॉटची विक्री केल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद ः महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कामाला लागलेली असताना भूखंडमाफियांनी संधी साधून तब्बल अडीच ते तीन एकरांत बेकायदा प्लॉटिंग टाकून प्लॉट विक्री केल्याचा प्रकार खाम नदीपात्रात हिमायतनगर परिसरात समोर आला आहे. याबाबत तक्रार प्राप्त होताच महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने अनधिकृत प्लॉटिंग निष्कासित केली. 

शहर परिसरात बेकायदा प्लॉटिंगचा व्यवसाय अद्याप तेजीत आहे. हिमायतनगर भागात तर लॉकडाउनमध्ये बेकायदा प्लॉटची विक्री केल्याचे समोर आले आहे. सर्व्हे क्रमांक १०७ ग्रीन झोन असून, जमिनीचा वापर फक्त शेतीसाठी करता येतो. मात्र खाम नदीपात्रात काही जमीन मालकांनी अनधिकृतपणे २० बाय ३० आणि ४० बाय ३० आकाराचे शंभर प्लॉट पाडले व एजंटांमार्फत ते विक्रीही करून टाकले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

याबाबत महापालिकेकडे मार्च महिन्यातच तक्रार आली होती. मात्र लॉकडाउनमुळे कारवाई करण्यात आली नव्हती. दरम्यान, गुरुवारी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी या ठिकाणी धाव घेत कारवाई केली. जेसीबीच्या मदतीने काही तासांत संपूर्ण अनधिकृत प्लॉटिंग निष्कासित करण्यात आली. काही ठिकाणी बांधकामही सुरू करण्यात आले होते. या बांधकामांचीही पाडापाडी करण्यात आली. 
 
रस्ते, ड्रेनेजलाइनची सुविधा 
बेकायदा प्‍लॉटिंगची लवकरात लवकर विक्री व्हावी यासाठी भूखंड माफियांनी रस्ते, ड्रेनेजलाइनची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तसेच वीज वितरण कंपनीने विद्युत पोल उभारण्यासाठी तयारीही सुरू केली होती. अनधिकृत प्लॉटिंगच्या ठिकाणी असलेले तीन विद्युत पोल जप्त करण्यात आले. कच्चे रस्ते उखडून टाकण्यात आले. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी जे. ई. जाधव, सविता सोनवणे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, मजहर अली यांनी केली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 
 
लवकरच नोटिसा 
खाम नदीच्या पात्रातील अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पुन्हा अतिक्रमणे झाली आहेत. मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग करून नागरिकांना विकण्यात आले. घरे बांधून राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेतर्फे नोटिसा बजावण्यात येणार आहेत. हिलाल, जलाल कॉलनीमध्येही कारवाई करण्यात येणार आहे. खाम नदीच्या पात्रात सर्व्हे नंबर १०७ चा भाग येतो. त्यामुळे नागरिकांनी अनधिकृत प्लॉटिंग खरेदी करू नये, दोषींवर लवकरच गुन्हासुद्धा दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा महापालिकेने दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal News