
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लस देण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे
औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लस देण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. त्यासाठी केंद्रांचे नियोजन करण्याचे काम सुरु असून आहे. एका केंद्रावर शंभर जणांना कोरोना लस दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली.
केंद्र व राज्य सरकारकडून जानेवारी महिन्यात कोरोना लस उपलब्ध करुन देण्याची दाट शक्यता आहे. २८ दिवसाच्या अंतराने कोरोना लसीच्या दोन मात्रा दिल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.
स्क्रु ड्रायव्हरने भोसकले; प्लॉटच्या वादातून भावाचा खून
दुसऱ्या टप्प्यात पोलीस, होमगार्ड, सफाई कामगारांना दिली जाणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. निता पाडळकर म्हणाल्या की, कोरोना लस देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. चार प्रकारच्या लस तयार होत असल्यातरी आपल्याकडे कोणती लस येणार हे मात्र सांगता येत नाही. कोरोना लस ही २ ते ८ सेंटीग्रेड तापमानात ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून दोन आयएलआर (आईस लाइंड रेफ्रिजरेटर ) मिळाले आहेत. या आयएलआरची क्षमता २२५ लीटर इतकी आहे.
महापालिकेला लागणारे मनुष्यबळ, लसीकरणासाठी केंद्र निश्चित करण्याचे काम सुरु आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रावर तीन खोल्यांमध्ये व्यवस्था केली जाणार आहे. पहिल्या खोलीत लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींना बसविण्यात येईल, दुसऱ्या खोलीत त्याची ओळख तपासण्यात येईल, तिसऱ्या खोलीत लस देण्याची सुविधा असेल.
मित्राच्या वाढदिवसाला तलवार घेऊन नाचले, अन बाराच्या भावात गेले
को-विन अॅपव्दारे नोंदणी केल्यावर लस घेणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मोबाईलवर तारीख कळविण्यात येईल. त्याच दिवशी त्या व्यक्तीला केंद्रावर बोलावण्यात येईल. एका केंद्रावर दिवसभरात शंभर जणांना लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला अर्धा तास बसवून ठेवले जाईल. त्यानंतर त्यास घरी पाठवण्यात येईल. येत्या आठवड्यात राज्यस्तरीय कार्यशाळा होणार असून त्यामध्ये लसीकरणाबद्दल आणखी माहिती दिली जाणार असल्याचे डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.
(edited by- pramod sarawale)