निरोपाआधीच घेतला आरोग्ययोद्ध्याने ‘निरोप’, दंत महाविद्यालयाच्या चालकाची एक्झिटने चटका

Wednesday, 3 June 2020

गतवर्षी राज्य शासनाच्या महाआरोग्य शिबिरावेळी मोबाईल व्हॅनद्वारे त्यांनी पालघर, दीव-दमणसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा बजावली. विशेषतः आदिवासी भागातही त्यांनी या अभियानात योगदान दिले होते. 

औरंगाबाद ः गतवर्षी शासनाच्या महाआरोग्य शिबिरात हिरिरीने सहभाग घेतला. अविरत सेवा केली, आता अठ्ठावीस दिवसांनी म्हणजेच ३० जूनला ते निवृत्तच होणार होते. म्हणून त्यांचा सत्कार करून आभारही मानण्यात येणार होते; पण नियतीलाच ते मान्य नसावे.

निवृत्तीच्या निरोप समारंभाआधीच त्यांचा कोविड व इतर आजारामुळे मृत्यू झाला. त्यांची अचानक झालेली एक्झिट चटका लावणारी असून आरोग्य क्षेत्रात हळहळ होत आहे. 

शहागंज येथील ५८ वर्षीय आरोग्ययोद्धा शासकीय दंत महाविद्यालयात मोबाईल डेंटल व्हॅनवर चालक होते. येथे पाच वर्षांपासून ते काम करीत होते. यापूर्वी ते घाटीत रुजू होते. कामावर असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 

त्यांना २३ मेपासून त्यांना ताप, खोकला व दम लागत होता. २७ मेरोजी त्यांना घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु त्यांचा उपचारादरम्यान दोन जूनला पहाटे एकच्या सुमारास कोरोना आणि इतर आजाराने मृत्यू झाला. येत्या ३० जूनला ते निवृत्त होणार होते. 

 coronavirus : जालन्यात अजून दोघांना बाधा, तिघे कोरोनामुक्त   

अविरत सेवेबद्दल त्यांचा शासकीय दंत महाविद्यालयातर्फे यथोचित सत्कार करून त्यांना निरोपही देण्यात येणार होता; परंतु निवृत्तीच्या आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. शासकिय दंत महाविद्यालयातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

अभियानात योगदान 
गतवर्षी राज्य शासनाच्या महाआरोग्य शिबिरावेळी मोबाईल व्हॅनद्वारे त्यांनी पालघर, दीव-दमणसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा बजावली. विशेषतः आदिवासी भागातही त्यांनी या अभियानात योगदान दिले होते. 

बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या... 

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Corona Warrior Dies Due To Corona