औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रुग्ण लाखात; कर्मचारी शेकड्यात! 

gmch aurangabad
gmch aurangabad

औरंगाबाद : वर्षाकाठी साडेसहा लाख ओपीडी नोंदणी, तर लाखभर रुग्ण भरती होणाऱ्या घाटी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी झपाट्याने कमी होत आहेत. आधीच 744 पैकी 270 पदे रिक्त असून, या वर्षात तब्बल 38 कर्मचारी निवृत्त होत आहेत. 12 कर्मचाऱ्यांची पदोन्नती होणार आहे. त्यामुळे रुग्णसंख्या लाखात आणि कर्मचारी शेकड्यात असलेल्या या रुग्णालयाचा गाडा हाकणे घाटी प्रशासनाला अवघड बनले आहे.

मराठवाड्यासह खानदेश, पश्‍चिम विदर्भाची लाइफलाइन म्हणून घाटी रुग्णालयाकडे पाहिले जाते. 1,177 खाटांच्या रुग्णालयात दीड हजाराहून अधिक रुग्ण भरती असतात. दरम्यान, विद्यार्थीसंख्या वाढली, खाटांची संख्याही वाढणे प्रस्तावित आहे; मात्र आपत्कालीन 24 तास सेवा, व्हीआयपी दौरे, आरोग्य शिबिरे, त्यात वाढती रुग्णसंख्या यात घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अभावाचा रुग्णसेवेवर परिणाम जाणवायला सुरवात झाली आहे.

अनेक वर्षांपासून नव्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती नाही. दरवर्षी कर्मचारी निवृत्त होत आहेत. 2019 मध्ये 28 कर्मचारी निवृत्त झाले. त्यापैकी 15 लाडपागे समितीतून, तर तीन अनुकंपा तत्त्वावर भरण्यात आले. त्यातून 10 पदे रिक्त राहिली. आता 2020 मध्ये 38 कर्मचारी निवृत्त होतील. त्यातच 12 कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळेल. त्यामुळे आधीच 270 पदे रिक्त असताना रुग्णालयाचे दैनंदिन कामकाज, स्वच्छता, रुग्णसेवा, साफसफाईची कामे खोळंबल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे.

त्यात आणखी 40 कर्मचारी कमी झाल्याने पेच निर्माण होणार आहे. सध्या स्वच्छतेसाठी 66 कर्मचारी कंत्राटी स्वरूपाचे घेतलेले आहेत. त्यांची संख्याही वाढवण्यासाठी वारंवार घाटीने पाठपुरावा करूनही त्यावर तोडगा न निघाल्याने परिचारिकांसह डॉक्‍टरांवरील कामाचा ताण वाढला आहे. 

हेही वाचा : ...याच रूममध्ये होते अब्दुल सत्तार 22 तास! 

घाटीतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सद्यःस्थिती 
मंजूर पदे ः 755 
भरलेली पदे ः 474 
तात्पुरती पदे ः 61 
रिक्त पदे ः 270 
निरसित पदे ः 175 

दिवसेंदिवस कर्मचारी निवृत्ती आणि पदोन्नतीमुळे कमी होत आहेत. आहे त्या कर्मचाऱ्यांवर रुग्णालयाचे दैनंदिन काम चालवणे अवघड बनले आहे. आधीच रिक्त पदांमुळे अडचण असताना या वर्षभरात 38 कर्मचारी निवृत्त होतील. त्यांना पर्याय मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- डॉ. विकास राठोड, उपअधीक्षक, घाटी रुग्णालय, औरंगाबाद. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com