मराठवाड्याच्या मोसंबीला बाजारपेठ उपलब्ध करणार

संदीपान भुमरे
संदीपान भुमरे

औरंगाबाद-मराठवाड्यातील मोसंबीला दूरवरची बाजारपेठ उपलब्ध होईल. कमी पाण्यात फलोत्पादनचा विस्तार करण्यात येणार आहे. फळाच्या नवीन जातींचा शोध आणि संशोधन; तसेच त्याबाबत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा आपला विचार आहे. जगप्रसिद्ध पैठणीला राजाश्रय मिळवून देण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे, अशा अनेक योजनांची कशा प्रकारे अंमलबजावणी होईल, याबाबत फलोत्पादन व रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी सोमवारी (ता.17) येथे सविस्तर माहिती दिली. 
मंत्री श्री. भुमरे यांनी सोमवारी "सकाळ' कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यानंतर त्यांनी दिलखुलास संवाद साधला. ते म्हणाले, की आपल्या भागात पेरू, नारळ, मोसंबी, डाळिंब अशा पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. त्यामुळे या फळांवर आपल्या परिसरातच प्रक्रिया व्हायला हवी, यासाठी औरंगाबादेत 15 कोटींचे प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार आहेत; तसेच फळांच्या विविध जातींवर संशोधन करून त्या आपल्या भागात कशा आणता येतील, याचाही विचार सुरू आहे. यावेळी रामराव शेळके, दिलीप निरफळ, विनोद बोंबले, अक्षय जायभाये, विलास भुमरे, नामदेव खराद उपस्थित होते. 

ज्ञानेश्‍वर उद्यानाला निधी मिळणार 
मला मिळालेले खाते हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाडी, वस्तीवर मला कामे करता येणार असल्याने याचा आनंद आहे. पैठण येथील प्रसिद्ध संत ज्ञानेश्‍वर उद्यानाची अवस्था अत्यंत वाईट आहे. आमदार म्हणून मी हा विषय लावून धरलेला होता; मात्र यश येत नव्हते. याबाबत काही दिवसांपूर्वीच चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्यान व अन्य गोष्टींसाठी निधी देऊ, असे सांगितले आहे. पैठण येथे पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी चौपदरी रस्त्याच्या कामाला सहा महिन्यांत सुरवात होईल. याचा फायदा डीएमआयसी, एमआयडीसीला देखील होईल. ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेतून 55 गावांना पाणी देण्याच्या कामाला देखील लवकरच सुरवात होईल. जिल्ह्यातील ट्रॉमा केअरच्या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत लवकरच बैठक होईल. त्यानंतर आरोग्य विभागाचे सर्व प्रश्‍न मार्गी लागतील. 

पैठणीला मिळणार राजाश्रय 
जगप्रसिद्ध पैठणच्या पैठणीला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी स्वत: पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीच पुढाकार घेतला आहे. त्यांनीच आपल्याला सांगितले, की पैठणीला चांगले दिवस येतील, यासाठी आपल्याला काम करायचे आहे. याअनुषंगाने लवकरच मंत्रालयात बैठक होईल. त्यामुळे निश्‍चितच हे काम लवकर सुरू होईल. 

मोसंबीसाठी येताहेत दूरवरून व्यापारी 
पाचोड येथे मोसंबीची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या मोसंबीला आता दूरवरून मागणी वाढेल. त्यासाठी लांबून व्यापारी येत आहेत. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. 

फूड पार्कचे जूनमध्ये भूमिपूजन 
बिडकीन येथे उभारण्यात येणाऱ्या फूड पार्कचे येत्या जूनमध्ये भूमिपूजन होईल. पाचशे कोटींचा हा प्रकल्प असेल. त्यानंतर 12 महिन्यांत उद्योग उभे राहतील; तसेच रेशीम कोश वाढावे, यासाठीही विशेष प्रयत्न केले जातील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com