गरिबीने केली थट्टा! अंत्यविधीसाठी मृतदेह गावी नेण्यासाठी नातलगांकडे पैसे नव्हते

हबीबखान पठाण
Sunday, 24 January 2021

पण, मरणानंतरही त्यांची व्यथा संपली नाही. अंत्यविधीसाठी मृतदेह गावी नेण्यासाठी नातलगांकडे पैसे नव्हते.

पाचोड (जि.औरंगाबाद) : घरी अठराविश्वे दारिद्र्य. गाव सोडून उदरनिर्वाहासाठी एका हॉटेलमध्ये आचाऱ्याचे काम करून फाटक्या संसाराला ठिगळे देण्याचे काम ते करीत होते. पण, अचानक रोहिलागड-अंबड रस्त्यावर दुचाकी अपघातात काळाने त्यांच्यावर घाला घातला. पण, मरणानंतरही त्यांची व्यथा संपली नाही. अंत्यविधीसाठी मृतदेह गावी नेण्यासाठी नातलगांकडे पैसे नव्हते. नाही म्हणायला रुग्णालयात असलेल्या काहींनी वर्गणी करून अडीच हजार जमा केले. मात्र, एवढ्या पैशात कुणीही वाहनधारक बीडला जाण्यास तयार होत नव्हता. ही बाब जिल्हा परिषद सदस्य विलास भुमरे यांना कळल्यानंतर त्यांनी शववाहिकेची व्यवस्था केली.

अनीस गफूर पठाण (वय ४५ रा. बीड, ह. मु. आपतगाव, ता.औरंगाबाद) आणि संगीता ऊर्फ राहिबाई आश्रुबा कांबळे (रा. आडगाव) हे घरची परिस्थिती बिकट असल्याने उदरनिर्वाहासाठी कुटुंबीयासह आपतगाव येथे काही वर्षांपूर्वी आले होते. ते रोहिलागड (ता. अंबड) येथील मातोश्री हॉटेलवर आचारीचे काम करीत होते. काम संपल्यानंतर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास दुचाकीने ते आपतगावकडे जात होते.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

अपघातात त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी तीन वाजता पोस्टमार्टेमनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाइकांकडे पैसे नव्हते. त्यामुळे तो रुग्णालयातच ठेवलेला होता. हे पाहून रुग्णालयात असलेल्यांचे मन हेलावले. त्यांनी वर्गणी करून अडीच हजार रुपये जमा केले. परंतु, अडीच हजारांत कोणताच वाहनधारक येत नसल्याने त्यांना ताटकळण्याशिवाय पर्याय नव्हता. ही माहिती श्री. भुमरे यांना मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वाहन उपलब्ध करून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News No Money For Last Rituals To Relatives Pachod