शाळा बुडवणाऱ्या मुलांच्या मदतीने लागला या बहुचर्चित खुनाचा छडा 

मनोज साखरे
Sunday, 5 January 2020

त्या दिवशी स्नेहल रुग्णालयात गेल्या; तर नीलेश व दिनेश डकरे प्लॉट पाहण्यासाठी गेले. चित्रा घरी एकट्याच होत्या. प्लॉट पाहून आल्यानंतर पती व जावई घरी परतले. त्यांनी दरवाजा ठोठावला. प्रतिसादच मिळाला नाही. दोघांनी दरवाजा तोडला. आतील दृश्‍य पाहून त्यांना धक्काच बसला. कुणीतरी चित्रा यांचा गळा कापलेला होता व खोलीत रक्ताचा पाट पाहत होता. 

औरंगाबाद - चार वर्षांपुर्वी अमरावती जिल्ह्यातील एका डॉक्‍टर महिलेचा औरंगाबादेत गळा चिरुन खून झाला होता. हा खून अमोल घूगे या एका पोलिसाच्याच मुलाने व त्यावेळी अल्पवयीन असलेल्या एका मुलाने केला होता. त्या खूनातील संशयित अमोलचाही खून झाला. पण डॉक्‍टर महिलेचा खून शाळा बुडवणाऱ्या मुलांमुळे उघडकीस आला..तीन महिने पोलिसांचा तपास सुरु होता. 

दोन डिसेंबर 2015 ची सकाळ. साडेनऊची वेळ. औरंगाबादच्या सिडको एन-नऊ, एम-टू सारखी गजबजलेली वसाहत. या ठिकाणी विमलज्योती हाऊसिंग सोसायटीत डॉ. स्नेहल व डॉ. नीलेश आस्वार राहतात. स्नेहल यांच्या आई डॉ. चित्रा डकरे (वय 60, मूळ रा. हिवरखेड, ता. मोहाडी, जि. अमरावती) या पती दिनेश डकरे यांच्यासह अमरावतीहुन त्यांच्याकडे आल्या होत्या.

त्या दिवशी स्नेहल रुग्णालयात गेल्या; तर नीलेश व दिनेश डकरे प्लॉट पाहण्यासाठी गेले. चित्रा घरी एकट्याच होत्या. प्लॉट पाहून आल्यानंतर पती व जावई घरी परतले. त्यांनी दरवाजा ठोठावला. प्रतिसादच मिळाला नाही. दोघांनी दरवाजा तोडला. आतील दृश्‍य पाहून त्यांना धक्काच बसला. कुणीतरी चित्रा यांचा गळा कापलेला होता व खोलीत रक्ताचा पाट पाहत होता. 

हेही वाचा : एकशे अठ्ठ्यांशी जणांचा मृत्यू!, 296 जखमी वाचा : काय झाले असेल? 

मग काय पोलिसांची अख्खी टीम कामाला लागली. सीसीटीव्ही तपासण्यात आले. फेरीवाले, स्थानिकांची चौकशी झाली. दारू विक्रेते, रिक्षाचालकांची बैठक घेऊन रेकॉर्डवरील दीडशे गुन्हेगारांचे ठसेही घेतले. कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले; पण दोन महिने तपास जागेवरच होता. वैज्ञानिकदृष्ट्याही तपास केला गेला.

कॉल डिटेल्सवरूनही उकल होत नव्हती. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांचे पथक डकरे यांच्या अमरावती जिल्ह्यातील गावी जाऊन आले. पण, त्यांचे कुणाशी काहीच वैर नसल्याने धागाच सापडत नव्हता. पोलिसांनी तपासासाठी बारा पथके नेमली. घटनेनंतर सुरवातीचे वीस दिवस कसून तपास केला; मात्र हाती काहीच लागत नसल्याने पोलिसांची हतबलता वाढत होती. 

या बातमीशी याचाही संबंध - रात्री कॉल आला आणि कायमचाच घेऊन गेला, झाले असे की... 

अशी मिळाली दिशा... 
पोलिस फरशी मैदान येथे गेले. त्या वेळी शाळा बुडवून काही मुलं बागेत होती. पोलिसांना पाहून पळू ती लागली. विचारपूस केली. त्या वेळी ही मुलं नेहमीच शाळा बुडवून भंगार गोळा करून विकत असल्याची माहिती समोर आली. त्यांतील एकाने अमोल व त्याचा अल्पवयीन साथीदार दोघेही फरशी मैदान एम टू येथे नियमित बसतात आणि गांजा ओढतात, असे सांगितले. 

विशेषतः चौकशीनंतर "डकरे यांच्या खुनाच्या काही वेळापूर्वीच त्या दोघांनी गांजा ओढला. घटनेच्या दिवशी त्यांना तेथे पाहिले होते. खुनानंतर दोघेजण आता दिसत नाहीत.' ही बाब पोलिसांना कळाली. त्यांनी अमोल घुगे व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेत खाक्‍या दाखविला. चोरीसाठी गेलो; पण हातून खून झाल्याची कबुली त्यांनी दिली. घुगे हा तर पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याने पोलिस चक्रावले. 

डकरे यांनी विरोध केल्याने खून... 
मारेकऱ्यांनी शेजाऱ्यांच्या दारांना बाहेरून कड्या लावल्या. त्यानंतर ते चोरीच्या उद्देशाने झाडावरून खिडकीद्वारे पहिल्या मजल्यावरील डकरे यांच्या मुलीच्या फ्लॅटमध्ये घुसले. डकरे यांनी आरडाओरड करीत प्रतिकार केला. विरोध वाढत असतानाच अमोलने तोंड दाबून हात पाठीमागे बांधले व अल्पवयीन मुलाने कटरने तीनवेळा डकरे यांच्या गळ्यावर वार करून खून केला. त्यानंतर ते दागिने चोरी न करता पसार झाले. 

दोन शब्दांवर तपास.. 
विविध मार्गांनी तपास केला; पण यश येत नव्हते. निराश भावनेने पोलिस आयुक्तांकडे जात होतो. ते निराश होऊ नका, हिंमत ठेवा आणि मेहनत करा, असे सांगत होतो. जेथे खून झाला, त्याच भागात लक्ष केंद्रित करा, असे ते सुचवत होते. या दोन गोष्टींमुळे आम्हाला हुरूप आला आणि धागेदोरे मिळाले. अशी त्यावेळी तपास अधिकारी अविनाश आघाव यांनी प्रतिक्रीया दिली होती. 

खून करणाऱ्याचाही खून... 
अमोल घुगे या संशयिताने चित्रा डकरे यांचा खून केला होता. यात गुन्हा नोंद होऊन अटकही झाली. त्यानंतर कायदेशिर प्रक्रिया सुरुच होती. जामीन मिळाल्यानंतर अमोल पुन्हा घरी परतला. चार वर्षानंतर अर्थात 31 डिसेंबर 2019 ला तो चर्चेत आला. तो बेपत्ता झाला आणि त्याचाही मृतदेह सिडको एन-सात परिसरातील एका नाल्यात जळालेल्या अवस्थेत सापडला हा खून असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तपास सुरु केला आणि त्याचाही ओळखीच्याच मित्रांनी पुर्ववैमनस्यातून खून केला. अशी माहिती समोर आली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Opened Woman Murder Mystery