पुल टेस्‍टींगला म्‍हणजे काय? समजुन घ्या...

मनोज साखरे
Monday, 27 April 2020

मराठवाड्याच्या लोकसंख्येचा विचार करता ‘कोविड- १९’चा संसर्ग झालेले रुग्ण दोन ते पाच टक्क्यांच्या आतच आहेत. त्यामुळे येथे पूल टेस्टिंग करता येईल. पर्यायाने औरंगाबादसह मराठवाड्यातील संशयित रुग्णांची टेस्ट तत्काळ होईल. 

औरंगाबाद ः कोरोना उपचारासाठी राज्यात प्लाझ्मा थेरपीसह पूल टेस्टिंगला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शुक्रवारी हिरवा कंदील मिळाला. दोन टक्क्यांपेक्षा कमी रुग्णदर असलेल्या ठिकाणी पूल टेस्टिंग केली जाते असे निकष आहेत.

मराठवाड्यात दोन टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण आहेत. त्यामुळे मराठवाड्यातही पूल टेस्टिंगचा फायदा होऊ शकेल. परिणामी संशयित रुग्णांचे निदान तत्काळ व जलद गतीने होऊ शकेल. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शुक्रवारी देशातील सर्व राज्यांचे आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपीसह पूल चाचणीला मान्यता मिळाली.

याचा लाभ मराठवाड्यालाही होऊ शकतो. मराठवाड्याच्या लोकसंख्येचा विचार करता ‘कोविड- १९’चा संसर्ग झालेले रुग्ण दोन ते पाच टक्क्यांच्या आतच आहेत. त्यामुळे येथे पूल टेस्टिंग करता येईल. पर्यायाने औरंगाबादसह मराठवाड्यातील संशयित रुग्णांची टेस्ट तत्काळ होईल. 

 हे होतील फायदे 

  1. कमी कालावधीत जास्तीत जास्त टेस्ट होतील 
  2. संशयित रुग्णांचे लवकर निदान होण्यास मदत 
  3. चाचणीचा वेग वाढून वेळ, खर्च, किटची बचत 
  4. मनुष्यबळावरील ताण कमी होईल 
  5. मृत्यूदर कमी होऊ शकेल 
  6. पीपीई किटचीही बचत होऊ शकेल 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

पूल टेस्टिंग म्हणजे काय? 

पाच जण ‘कोविड-१९’ विषाणूच्या संसर्गाचे संशयित आहेत. त्या पाच जणांचे सॅम्पल एकत्र करायचे, त्याला पूल टेस्टिंग म्हणतात. ही चाचणी जर निगेटिव्ह आली तर पाचही जण निगेटिव्ह असतील; परंतु रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास प्रत्येकाची स्वतंत्र चाचणी करायची. पूल टेस्टिंगसाठी ‘आयसीएमआर’च्या गाइडलाईन्स आहेत. त्यानुसारच या टेस्ट होतात. 

डॉ. सचिन काळे यांनी सांगितलेले पूल टेस्टिंगचे निकष 

  • एकूण लोकसंख्येपैकी कोविडचा संसर्ग झालेले दोन टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण आहेत. त्या ठिकाणी पूल टेस्टिंग करता येते. 
  • ज्या ठिकाणी एकूण लोकसंख्येपैकी पाच टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णदर आहे, त्या ठिकाणी पूल टेस्टिंग करू नये. 
  • ज्या ठिकाणी एकूण लोकसंख्येपैकी दोन ते पाच टक्क्यांच्या आत रुग्णदर आहे तिथे केवळ कम्युनिटी सर्व्हे म्हणून पुलिंग टेस्ट करता येते; परंतु बाधित रुग्णांचे जवळचे नातेवाईक, उपचार करणारे डॉक्टर, नर्सिंग स्टॉफ यांची पुलिंग टेस्ट करू नये, हे ‘आयसीएमआर’चे निकष आहेत. 

‘‘एकाच वेळी शंभर संशयित रुग्णांची टेस्ट करायची झाल्यास शंभर किट लागतात; परंतु पूल टेस्टिंगमुळे पाच संशयित रुग्णांची एकाच वेळी टेस्ट करता येते. त्यानुसार शंभर रुग्णांचे पाचचे गट करून टेस्ट केल्या जातील. यासाठी २० किट वापरल्या जातील. यात १९ चाचण्या निगेटिव्ह आल्या व पाच रुग्णगटांची एक चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्या पाच रुग्णांची वैयक्तिक चाचणी केली जाईल. अर्थात, शंभरऐवजी २५ चाचण्या होतील. यातून सर्वच गोष्टी वाचतील. 
- प्रा. डॉ. सचिन काळे, लॅबप्रमुख एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Pool testing will also be useful for Marathwada