esakal | समजुन घ्या जमावबंदी आणि संचारबंदीतला फरक ..
sakal

बोलून बातमी शोधा

section 144

जमावबंदीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी नागरिकांना संचार करता येतो; मात्र संचारबंदीमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्याचीही मुभा नसते. संचारबंदी ही त्या-त्या क्षेत्रात जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त लागू करतात. संचारबंदी लागू केली गेली अशी जर अफवा येत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे

समजुन घ्या जमावबंदी आणि संचारबंदीतला फरक ..

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद ः कोरोना विषाणूचा राज्यात प्रादुर्भाव वाढत असून, देशपातळीवर मोठ्या उपाययोजना सुरू आहेत. त्याच धर्तीवर राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. २२) लागू केले; परंतु काहीजणांचा संचारबंदी लागू करण्यात आली, असा समज होत आहे.

पण ही केवळ जमावबंदी आहे, संचारबंदी नव्हे. जमावबंदीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोक जमू नयेत आणि त्यांनी एकत्रितरीत्या फिरू नये, असे आवाहन पोलिस करीत आहेत. 

जमावबंदी म्हणजे काय? 

  • स्थानिक पातळीवर पोलिस वेळोवेळी जमावबंदीचे आदेश देऊ शकतात. 
  • जमावबंदीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र यायला नको. त्यांनी एकत्रित फिरायला नको. 
  • पाचपेक्षा अधिक लोक जर एकत्रित येत असतील तर अशांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाऊ शकते. 
  • पाच किंवा अधिक लोक एकत्रित येऊन एखादा कार्यक्रम घेऊ शकत नाहीत किंवा कोणताही इव्हेंट ते आयोजित करू शकत नाहीत. एवढेच काय, तर लग्नकार्यही करता येत नाही. हेसुद्धा जमावबंदीचे उल्लंघन समजण्यात येते. 
  • जमावबंदीमध्ये कुणीही एकट्या-दुकट्या व्यक्तीला बाहेर जाऊन काही वस्तू किंवा साहित्य आणण्याची मुभा असते अथवा रुग्णालयासंबंधित महत्त्वाची काही कामे असतील तर ती करता येतात. 
  • पाचपेक्षा कमी लोक, एखादी व्यक्ती बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी अडविले असेल तर त्यांनी आपण बाहेर पडण्याचे कारण सांगितले पाहिजे. विशेष म्हणजे ते कारण ठोस असावे, असेही पोलिस विभागाकडून सांगण्यात आले आहे. 


घाबरून जाऊ नका 
जीवनावश्यक वस्तूंसंबंधी उदाहरणार्थ दूध, किराणा, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू आपणास खरेदी करण्यासाठी दुकाने उघडी असतील. जमावबंदीमध्येही आपण जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दुकानावर जाऊ शकता. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर अशावेळी एकाच व्यक्तीने खरेदीसाठी जाणे सोयीस्कर ठरेल. त्यामुळे गर्दीही टाळता येईल. 

हेही वाचा  - पुण्यात सन्नाटा

जमावबंदी आणि संचारबंदी यातला फरक 
जमावबंदीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी नागरिकांना संचार करता येतो; मात्र संचारबंदीमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्याचीही मुभा नसते. संचारबंदी ही त्या-त्या क्षेत्रात जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त लागू करतात. संचारबंदी लागू केली गेली अशी जर अफवा येत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

हे महत्त्वाचे... 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा आयुष्याशी निगडित आहे. विरोध म्हणून, बेफिकिरी करून चालणार नाही. पूर्वग्रह अथवा फाजील आत्मविश्‍वास दाखवून वेगळे काही करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नका. 
 

हेही वाचा 

राज्यातील कोरोना विषाणुचा संसर्ग वाढला

पाऊले थांबली पण इरादा बुलंद

go to top