
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर लस कधी येईल यासाठी टक लावून लोक बसली होती. परंतु, कोरोनाचा संसर्ग जसा हळूहळू कमी होत गेला तसे नागरिकही निर्धास्त होत आहेत.
औरंगाबाद : अगदी लहान मुलांना आवश्यक लसीकरण केल्यानंतर त्यांना थोडासा त्रास जाणवतो. तशाच प्रकारे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही किरकोळ त्रास जाणवू शकतो. हा त्रास शंभरात दहापेक्षा कमी लोकांना होऊ शकतो. त्यामुळे अस्वस्थता जाणवते. पण, हा त्रास अपेक्षितच आहे. प्रतिकारक शक्ती वाढण्याचे ते संकेत असतात. त्यामुळे लस घ्यावी, असे आवाहन लस घेतलेल्या डॉक्टरांनी नागरिक व आरोग्य सेवकांना केले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर लस कधी येईल यासाठी टक लावून लोक बसली होती. परंतु, कोरोनाचा संसर्ग जसा हळूहळू कमी होत गेला तसे नागरिकही निर्धास्त होत आहेत. हेच निर्धास्तपण व लसीबाबतचे समज, गैरसमज यातून लस टोचून घेतानाही अनेकजण हात आखडता घेत आहेत. परंतु, शरीरात ॲन्टीबॉडीज तयार करण्यासाठी लस महत्त्वपूर्ण असून, रोगप्रतिकारक शक्तीलाही चालना मिळणार आहे. त्यामुळे क्षणभराचा त्रास सोडा रोग प्रतिकारक शक्तीकडे लक्ष द्या. त्यासाठीच लस घ्या असा महत्त्वपूर्ण सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा
लगेच कामाला लागलो
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, ‘‘कोरोनाची लस मी घेतली व रुग्णालयात लगेच कामाला लागलो. लोकांनी माझे अनुकरण करावे व लस घ्यावी. लस घेतल्याने काही होत नाही हे मीही दाखवून दिले. माझे वय ६२ आहे, व्याधीही आहेत तरीही मी लस घेतली. काही तास उलटून गेले मी माझ्या कर्तव्यावर काम करतोय. लस सुरक्षित आहे. सर्वांनी घ्यायला हवी. मी कोरोनाच्या सांनिध्यात राहूनही माझ्या शरीरात प्रतिजैविके (ॲन्टीबॉडीज) तयार झाले नाहीत. कोरोनाबाधित झाल्यानंतरही काही रुग्णांमध्ये ॲन्टीबॉडीज तयार होत नाहीत. त्यामुळे लस घेणे गरजेचे आहे. परदेशासारखी परिस्थिती आपल्या देशात नाही. परंतु ती आली तर आपण थोपवू शकूच असे नाही. त्यामुळे सर्वांमध्ये लसीच्या माध्यमातून ॲन्टीबॉडीज तयार व्हायला हव्यात. त्यामुळे मी सर्वांनी लस घ्यावी.’’
लोकांनी घाबरण्याची गरज नाही. लस पूर्णपणे सुरक्षित आहे. आज आम्ही सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी लस घेतली. लोकांनीही लसीकरण करून घेण्याची गरज आहे.
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.बन्सीलालनगरच्या केंद्रावर आम्ही लस घेतली. अत्यंत काळजी तेथे घेतली जात असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी व आरोग्यसेवक मास्क घालून सज्ज आहेत. किरकोळ त्रास जाणवला. लस घेताना कोणताही त्रास झाला नाही. चोवीस तासात १० टक्के थोडे अस्वस्थता जाणवते पण तो अपेक्षित त्रास आहे. लस घेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.
- डॉ. मंजूषा शेरकर, बालरोगतज्ज्ञ.काही त्रास झाला नाही. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. काही लोकांना किरकोळ त्रास होऊ शकतो. थोडी काळजी घ्यावी. लसीकरणापूर्वी थोडे खाऊन जावे. लस टोचल्यानंतर आराम करावा. हलके जेवण करून पाणी भरपूर प्यावे. प्रवास टाळावा. डॉक्टरांच्या संपर्कात राहावे. काहींना अंगदुखीचा त्रास होऊ शकता. परंतु, ते सामान्य आहे. रोगप्रतिकारक क्षमता कार्यरत झाल्याने ही लक्षणे जाणवतात. प्रत्येकाने लस घ्यायला हवी.
- डॉ. अशोक शेरकर, माजी अध्यक्ष, आयएमए
संपादन - गणेश पिटेकर