काय आहे प्लाझ्मा थेरपी? जाणुन घ्या

मनोज साखरे
Monday, 27 April 2020

विषाणू किंवा जिवाणूमुळे झालेल्या आजारातून एखादी व्यक्ती बरी झाल्यावर तिच्या शरीरात त्या विषाणू अथवा जिवाणूला विरोध करणारी प्रतिजैविके तयार होतात. ही प्रतिजैविके शरीरात अल्पकाळ किंवा कायमस्वरूपी राहतात. याचप्रमाणे, कोविड-१९ विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा आजारी व्यक्तीच्या रक्तात सोडल्यास ही प्रतिजैविके विषाणूविरोधात काम करतील.

औरंगाबाद ः कोरोनावर इलाज शोधण्यासाठी संशोधकांकडून पराकोटीचे प्रयत्न सुरू असतानाच आता प्लाझ्मा थेरपीचा अवलंब होत आहे. प्लाझ्मा देण्यासाठी अमेरिकेत रांगा लागल्या आहेत.

देशातही ठिकठिकाणी क्लिनिकल ट्रायल सुरू झाले आहे. याबाबत औरंगाबादेतील घाटी रुग्णालय आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयाने प्रस्ताव पाठविला आहे. त्याअनुषंगाने प्लाझ्मा थेरपी काय आहे, याचा घेतलेला हा आढावा. 

शंभर वर्षे जुनी उपचारपद्धती 
प्लाझ्मा उपचारपद्धती सुमारे शंभर वर्षे जुनी आहे. वर्ष १९१८ ला फ्लूची साथ आली होती. त्यावेळीही तिचा प्रयोग झाला होता. प्लाझ्मा थेरपीबाबत औरंगाबादच्या एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे लॅबप्रमुख प्राध्यापक डॉ. सचिन काळे यांनी सांगितले, की कोविड-१९ या आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तामध्ये कोविड-१९ च्या विषाणूविरोधी अॅंटीबॉडीज म्हणजे एक प्रकारचे प्रोटिन तयार होते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

हे प्रोटिन किंवा अँटीबॉडी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्मामार्फत, जर एखाद्या कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णास दिले, तर या अँटीबॉडी कोरोना व्हायरसला मारायला मदत करते व रुग्ण वाचतील असा कयास आहे. अशा प्लाझ्मा थेरपीचा वापर यापूर्वी सार्स आणि मेर्स या आजारांमध्ये केला गेला होता; पण सध्या कोविड-१९ आजारात याचा किती उपयोग होईल हे अजून सिद्ध झाले नाही. त्यामुळे याचा वापर प्रायोगिक तत्त्वावर केला सुरू आहे. 

ही आहे उपचारपद्धती 
विषाणू किंवा जिवाणूमुळे झालेल्या आजारातून एखादी व्यक्ती बरी झाल्यावर तिच्या शरीरात त्या विषाणू अथवा जिवाणूला विरोध करणारी प्रतिजैविके तयार होतात. ही प्रतिजैविके शरीरात अल्पकाळ किंवा कायमस्वरूपी राहतात. याचप्रमाणे, कोविड-१९ विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा आजारी व्यक्तीच्या रक्तात सोडल्यास ही प्रतिजैविके विषाणूविरोधात काम करतील.

ही प्रतिजैविके कोरोना विषाणूच्या बाह्य आवरणावर हल्ला करीत त्यांना मानवी पेशींमध्ये घुसण्यापासून रोखतात. यामुळे विषाणू नष्ट होऊन प्रतिकारशक्ती वाढते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

यांना सर्वाधिक फायदा 

  • अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांवरच प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यास परवानगी आहे. 
  • आजारातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातून एकदाच काढलेल्या प्लाझ्माचा वापर दोन रुग्णांवर उपचार करण्यासाठी करता येतो. 
  • या थेरपीचा वापर करण्याची परवानगी मिळालेल्या संशोधन संस्था-आजारातून बरे झालेल्यांना प्लाझ्मा देण्याचे आवाहन करीत आहेत. 
  • अमेरिकेतील ह्युस्टन येथे सर्वप्रथम या थेरपीचा वापर झाला. चीनमध्येही हा प्रयोग झाल्याचे सांगितले जाते. 
  • प्लाझ्मा थेरपीही पूर्वपरंपरागत आहे. गंभीर आजारात ही उपचारपद्धती वापरली आहे. 

 

प्लाझ्मा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्तातून २८ दिवसांनी किंवा रुग्णांचे दोन स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतर १४ दिवसांनी, प्रमाणित रक्तपेढीमार्फत काढता येतो. यासाठी रुग्ण कोरोनामुक्त तर असावाच लागतो; पण इतर आजार उदाहरण एचआयव्ही, हिपॅटायटीस बी, सी या आजरांपासूनही मुक्त असावा लागतो. 
- डॉ. सचिन काळे 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News What is Plasma Therapy? Find out