esakal | फळ माकडांना प्रिय अन् खोड औषधांचे आगर...! इतिहासाशी नाते सांगणारे हे अगडबंब झाड आहे तरी कोणते?

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

गोरखचिंचेच्या झाडाचे खोड, फांद्यांवर सिलिकॉन आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्याने ते चांदण्या रात्रीत उजळल्यासारखे दिसते. त्यावेळी ते भीतीदायक वाटत असल्याने बाओबाब नाव पडले आहे. मधुमेह, दमा, डांग्या खोकला, ताप या आजारांत या झाडाची पाने, फळाच्या आतील मगज यांचा उपयोग केला जातो.

फळ माकडांना प्रिय अन् खोड औषधांचे आगर...! इतिहासाशी नाते सांगणारे हे अगडबंब झाड आहे तरी कोणते?
sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद - अगडबंब आकार, त्याला १० ते १५ सेंटिमीटर व्यासाची पांढरीशुभ्र फुले आणि लोंबकळणारी लांबलचक फळे पाहून साहजिकच हे कशाचे झाड असेल बुवा, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडतो. गोरखचिंचेची अशी शहरात पाच ते सहाच झाडे शिल्लक असल्याने या झाडांना महापालिकेकडून हेरिटेज ट्रीचा दर्जा मिळालेला आहे. या झाडांचे नाते थेट औरंगाबाद शहर विकसित करणाऱ्या मलिक अंबरशी सांगितले जाते. सध्या या झाडांवर पांढरीशुभ्र फुले पाहायला मिळत आहेत. 

मोजक्याच ठिकाणी गोरखचिंच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाट्यगृह, ‘साई’कडील शिक्षणशास्त्र विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, समर्थनगर, चिकलठाणा, मिलकॉर्नर येथील औरंगाबाद टेक्सटाईल मिल अशा मोजक्याच ठिकाणी गोरखचिंचेची झाडे आहेत. नगरच्या निजामाचा सरदार मलिक अंबरने खडकी म्हणजे आजच्या औरंगाबादचा विकास केला. मलिक अंबर हा मूळचा इथिओपियाचा हब्शी गुलाम होता. त्याची विक्री होत होत तो नगरच्या निजामाच्या पदरी होता. या मलिक अंबरमुळे या झाडाच्या बिया येथे आल्याचे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. 

हेही वाचा- महिलांना येथे मिळतो आधार..

मंकी ब्रेड ट्री म्हणूनही ओळख
महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख विजय पाटील यांनी सांगितले, की या झाडाला गोरखचिंच, बाओबाब तर मध्य आफ्रिकेत मंकी ब्रेड ट्री नावाने ओळखले जाते. याचे मूळ स्थान मध्य आफ्रिकेत आहे. या झाडाचे खोड विचित्र आकारात वाढते. दहा ते पंधरा मीटर उंच वाढते आणि याच्या बुंध्याचा व्यास १० मीटरपर्यंत असतो. पानगळीचे झाड असल्याने हिवाळ्यात हे झाड सारी पाने झडून निष्पर्ण दिसते. ऐतिहासिक महत्त्व व दुर्मिळ असल्याने याला हेरिटेज ट्री घोषित केले आहे. चिकलठाणा येथील या झाडाजवळ महापालिकेच्या वतीने माहितीचा फलक लावण्यात आला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

माकडांची भाकर 
जून-जुलैमध्ये या झाडाला फुले येतात. १५ सेंटिमीटर इतका या फुलांचा आकार असतो. या झाडाची फुले रात्री उमलतात. या फुलांचा वास उग्र येतो. झाडाच्या भल्यामोठ्या चिंचेच्या (फळ) मधला गर माकडे खूप आवडीने खातात. म्हणून आफ्रिकेत या झाडाला मंकी ब्रेड ट्री (माकडाची भाकर) म्हणतात. 

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?  

औषधी गुणधर्म मुबलक 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. नारायण पंडुरे यांनी सांगितले, की झाडाचे खोड, फांद्यांवर सिलिकॉन आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्याने ते चांदण्या रात्रीत उजळल्यासारखे दिसते. त्यावेळी ते भीतीदायक वाटत असल्याने बाओबाब नाव पडले आहे. मधुमेह, दमा, डांग्या खोकला, ताप या आजारांत या झाडाची पाने, फळाच्या आतील मगज यांचा उपयोग केला जातो. गरामध्ये प्रोटिनचे प्रमाण खूप असते. झाडाच्या ढोलीत पाणी साठवता येऊ शकते. आफ्रिकेत तर या झाडांच्या ढोलीचा उपयोग राहण्यासाठी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.