औरंगाबाद : या उड्डाणपुलाच्या खालून कसे जाल... वाचा

मधुकर कांबळे 
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

उड्डाणपुलाखालचा भाग चकाचक होणे तर दूरच किमान तिथून ये-जा करण्याइतपत तरी कधी होईल याची या रस्त्याने जाणाऱ्यांना प्रतीक्षा आहे. 

औरंगाबाद - महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर टाऊन हॉल येथील उड्डाणपूल आहे. मात्र या उड्डाणपुलाखाली बाराही महिने वाहणाऱ्या गटारीच्या पाण्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

आधी दुर्गंधीयुक्‍त पाण्यामुळे तर आता रस्ता खोदून ठेवल्याने ही वाट बिकट बनली आहे. या पुलाखालून अनेकांना जावे लागते मात्र पुलाच्या खालून जाणे म्हणजे मोठ्या दिव्यातून जाण्यासारखे झाले आहे.

रेल्वेस्टेशनपासून थेट जळगाव रोडला जोडणारा रस्ता व्हीआयपी रस्ता म्हणून ओळखला जातो. कारण या रस्त्यावरच सुभेदारी विश्रामृह, विभागीय आयुक्‍तालय, जिल्हाधिकारी कार्यालय आहे.

पहा : लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नाचवले कुणी

काजीवाड्यापासून आमखास मैदानाकडील क्षयरोग हॉस्पिटलपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याने उड्डाणपूल बांधला आहे. या उड्डाणपुलामुळे टाऊन हॉल, जयभीमनगर चौकातील अपघातांची मालिका बंद झाली आहे. उड्डाणपुलावर व पुलाखाली दोन्ही बाजूने प्रकाश पडेल अशा पथदिव्यांची व्यवस्था केली आहे. मात्र उड्डाणपुलाच्या खालच्या दोन्ही बाजूंनी तयार करण्यात आलेले रस्ते अतिशय अरुंद असल्याने पुलाच्या बाजूने मोठ्या वाहनांना जाताना खूप अडचणी येत आहेत. 

टाऊन हॉल उड्डाणपुलाखाली पान-चहाच्या टपऱ्या थाटण्यात आल्या आहेत. हातगाडीवर फळे विकणारे आणि रस्त्यातच उभी राहणारी मोठी वाहने रस्त्यावरच्या रहदारीला अडथळा ठरत आहेत. उड्डाणपुलाखालून वाहणारा मोठा नाला रस्ता तयार करताना वरून बंद करण्यात आला असला तरी त्याखालून ड्रेनेजलाइन जाते.

हेही वाचा : निकम साहेब... हे जेवण मीच बनवलय ना !

आरेफ कॉलनीपासून सर्व बाजूंनी उतार असल्याने या ड्रेनेजमधून वाहत येणारे घाण पाणी नेमके या पुलाखाली असलेल्या चेंबरमधून संपूर्ण रस्त्यावर पसरत असते. त्यामुळे या दुर्गंधीयुक्‍त पाण्यातूनच वाहनधारक, पादचाऱ्यांना मार्ग काढावा लागतो. 

पावसाळ्यात साचते तळे 

पावसाळ्यात तर या ठिकाणी अक्षरश: तळे साचते. महापालिका प्रशासन या ड्रेनेजच्या पाण्यावर कायमचा तोडगा काढण्याऐवजी दरवेळी थातूरमातूर उपाययोजना करते. यामुळे उड्डाणपुलाखालचा भाग चकाचक होणे तर दूरच किमान तिथून ये-जा करण्याइतपत तरी कधी होईल याची या रस्त्याने जाणाऱ्यांना प्रतीक्षा आहे. 

क्‍लिक करा : अवेळी पावसाने नुकसान शेतकऱ्यांना मिळाली इतकी रक्‍कम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Over Bridge News