कोरोनाच्या `रेड झोन` शहरात ‘आओ-जाओ घर आपका’!

शहरनामा
शहरनामा
Updated on

औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सीमा बंद करण्यात आल्या आहेत. व्यक्ती अथवा सर्वप्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा आणि परवानगी सोडून) जिल्हाबंदी लागू आहे. बहुतांश जिल्ह्यांतील पोलिस प्रशासनाकडून याची कडक अंमलबजावणीही केली जात आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील पोलिस प्रशासन सुरक्षेच्या बाबतीत कुठेतरी कमी पडतेय की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे लगतच्या जिल्ह्यांतून दुचाकी, चारचाकी अथवा पायी येणाऱ्यांना शहर आणि जिल्ह्यात बिनदिक्कतपणे प्रवेश मिळतो. गेल्या काही दिवसांत तब्बल दीड लाखावर नागरिक बाहेरून आले आहेत. त्यामुळे ‘आओ-जाओ, औरंगाबाद अपनाच...’ झाल्याची स्थिती आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

‘रेड झोन’ असूनही प्रवेश कसा? 
कोरोनारूपी महाराक्षस दबा धरून बसलेला असताना आणि शहर ‘रेड झोन’मध्ये गेलेले असताना तसेच अन्य जिल्ह्यांतील सीमा बंद केलेल्या असतानाही आपल्या शहरात येणाऱ्यांना बिनारोखठोक प्रवेश मिळतोच कसा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शहरवासीयांच्या भल्यासाठी नियमाला धरून ज्या कठोर उपाययोजना कराव्या लागतील त्या त्या करण्यास कुणाचीही हरकत असण्याचे काहीही कारण नाही. परंतु अन्य जिल्ह्यांतून औरंगाबाद शहरात येणाऱ्यांना जर पोलिसच प्रवेश देत असतील तर मात्र हा प्रकार गंभीरच म्हणावा लागेल. त्यामुळे पोलिस आयुक्त साहेब, आता तरी आपली मवाळ भूमिका सोडून कडक धोरण राबविण्याची हीच खरी वेळ आहे. जिल्हाबंदी असतानाही केवळ एका दिवसातच नगर नाका ओलांडून ३ हजारांवर लोक जर शहरात येत असतील तर मात्र मामला गंभीर आहे, असेच म्हणावे लागेल. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सरकारच्या धोरणालाच सुरुंग 
पोलिस आयुक्त साहेब, आपण स्वतः लक्ष घालून या प्रकाराला आळा घालण्याची नितांत आवश्यकता आहे; अन्यथा लोंढेच्या लोंढे शहरात आल्यास कायदा व सुव्यवस्थेबरोबरच कोरोनाच्या संसर्गाची बाधा वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या सीमाभागात कडक तपासणी व्हावी, औरंगाबादेत येणाऱ्यांना नाक्या-नाक्यावरच रोखण्यासाठी आपल्या टीमला आदेश द्यावेत. औरंगाबाद ग्रामीण क्षेत्रातील नाक्यावरूनही जरी कुणी शहरात तसेच जिल्ह्यात येत असेल तर ढिलाई न करता जिल्हा पोलिस अधीक्षकांनीदेखील कडक भूमिका घेतली पाहिजे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारच्या धोरणालाच सुरुंग लावण्याचे काम त्वरित थांबले पाहिजे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

लॉकडाउननंतरही एक लाख ६६ हजार लोक शहरात! 
जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्यानंतर आणि लॉकडाउन केल्यानंतरही शहरात आतापर्यंत नगर नाका, जालना रोडवरील केंब्रिज स्कूल नाका तसेच हर्सूल नाका येथून तब्बल १ लाख ६६ हजार लोक शहरात दाखल झाले असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दैनंदिन नोंदीवरून उघड झाले आहे. मंगळवारी (ता.१४) फक्त नगर नाका मार्गावरून १ हजार ५५५ वाहनांमधून तब्बल ३ हजार १४७ नागरिक शहरात दाखल झाल्याचे समोर आले आहे. परभणी येथील जिल्हा प्रशासनाने मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील जिल्ह्यात प्रवेश नाकारल्याची घटना ताजी असताना आपल्याकडील मवाळ धोरणातही तातडीने बदल करणे क्रमप्राप्त असल्याचे मत आता नागरिकांतूनही व्यक्त होत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com