
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अॅप करण्यापूर्वी जिल्हाभरातील साधारण ३४ अपघातप्रवण क्षेत्राची माहिती ड्रोन कॅमेऱ्यातून टिपण्यात आली.
औरंगाबाद : जिल्ह्यातील अपघातांच्या वाढत्या संख्या लक्षात घेता ग्रामीण पोलिस विभागाकडून सेफ ड्राईव्ह नावाचे मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. वाहनधारकाला अपघातप्रवण क्षेत्राच्या ५०० मीटरच्या कक्षेत प्रवेश करताच त्यासंदर्भातील माहिती या अॅपवरून मिळणार असल्याचा दावा पोलिस विभागाकडून केला जात आहे.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अॅप करण्यापूर्वी जिल्हाभरातील साधारण ३४ अपघातप्रवण क्षेत्राची माहिती ड्रोन कॅमेऱ्यातून टिपण्यात आली. रस्ता सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाढत असलेल्या अपघाताची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने सेफ ड्राईव्ह अॅप तयार करण्यात आल्याचे पोलिस विभागातर्फे सांगण्यात आले.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा
रस्ते सुरक्षेअंतर्गत ग्रामीण पोलिसांकडून विविध उपक्रम राबवण्यात आले. वाहनांना रिफ्लेक्टर (अंधारात चमकणारे स्टीकर) लावण्यासाठी १९८ मोहिमा राबवण्यात आल्या. १३ शिबिरे यामध्ये शालेय वाहनचालकांची ११ शिबिरे घेणयात आली. अपघातातून होणाऱ्या नुकसानीबाबतची जनजागृती करण्यासाठी ३० हजाराहून अधिक वाहतूक सुरक्षा पुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध ९३ हजार ८४७ खटले भरून २ कोटी १६ लाख ६८ हजार २२० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचेही पोलिस सुत्रांनी सांगितले.
पोलिस म्हणतात अपघात कमी
औरंगाबाद जिल्ह्यात २०१९ मध्ये एकूण ५५८ अपघात घडले. तर २०२० मध्ये ४६१ अपघात घडले. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये १७ टक्क्यांनी अपघातात घट झाल्याची माहिती पोलिस विभागातर्फे देण्यात आली.
संपादन - गणेश पिटेकर