आपची महाराष्ट्रात एन्ट्री; लातूरच्या दापक्याळमध्ये मिळविली सत्ता, अरविंद केजरीवालांनी मराठीत दिल्या शुभेच्छा

प्रशांत शेटे
Tuesday, 19 January 2021

दापक्याळ (ता.चाकूर) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे जिल्‍हाध्‍यक्ष प्रताप भोसले यांच्‍या नेतृत्‍वाखाली पॅनलने बहुमत मिळविले आहे.

चाकुर (जि.लातूर) : आम आदमी पक्षाने ग्रामपंचायती निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. दापक्याळ (ता.चाकूर) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाचे जिल्‍हाध्‍यक्ष प्रताप भोसले यांच्‍या नेतृत्‍वाखाली पॅनलने बहुमत मिळविले आहे. लातुर जिल्‍ह्याच्‍या राजकारणात सार्वत्रिक निवडणुकीत विजयी मिळवून आपचा झेंडा रोवल्याबद्दल दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मराठीत शुभेच्छा पाठवून अभिनंदन केले आहे.
दापक्‍याळ ग्रामपंचायतीवर गेली चाळीस वर्षांपासून सत्‍ता गाजविणाऱ्यांना प्रस्थापितांना आम आदमी पक्षाचे लातूर जिल्‍हाध्‍यक्ष प्रताप भोसले यांनी धक्‍का दिला आहे.

बेरोजगारांच्या खिशातून केली पोस्टाने तीस कोटींची कमाई!पदभरतीच्या नावाखाली तिजोरी भरण्याचे काम

या ग्रामपंचायतीत सात पैकी पाच जागेवर त्यांच्या पॅनलने विजय मिळविला आहे. यात उर्मिला भोसले, संतोष कासले, पूजा पाटील, कलिमून शेख, शंकर कांबळे हे उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयाबद्दल दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्‍ट्र आपचे संयोजक रंगा राचूरे, सचिव धनंजय शिंदे, युवा प्रदेशाध्‍यक्ष अजिंक्‍य शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निकाल घोषित झाल्यानंतर तातडीने ट्विटरच्या माध्यमातून नवनियुक्त सदस्यांना मराठीतून शुभेच्छा पाठविल्या आहेत. 

 

मराठवाड्याच्या आणखी ताज्या बातम्या वाचा

धनशक्‍ती विरोधात जनशक्‍तीचा हा विजय  
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवत जनतेने जातीयवाद, भ्रष्‍टाचाराला ठोकर मारून समतावादी विचारांना, नवीन चेहऱ्यांना गावचा विकास साधन्‍यासाठी विजयी केले आहे. त्‍याचा आदर ठेवत गावातील अंतर्गत रस्‍ते, पथदिवे यांच्या दुरूस्तीसह गावचा संपूर्ण विकास करण्‍यासाठी आम्‍ही कटिबद्ध आहोत. 
- प्रताप भोसले, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पक्ष, लातूर

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arvind Kejriwal Congratulating Dapkyal GramPanchayat Members Latur News