गाईच्या डिलिव्हरीसाठी औरंगाबादकर धावले; नागरिकांनी रात्रभर दिला पहारा

अनिल जमधडे
Tuesday, 23 February 2021

खडकेश्वर येथील पशूवैद्यकीय रुग्णालयाला माहिती देण्यात आली. त्यानंतर डॉ. सुरज दाभाडे, डॉ.गणेश चव्हाण, डॉ. आकाश शिंदे यांनी धाव घेऊन गाईवर शस्त्रक्रिया केली.

औरंगाबाद : बेवारस आणि अवघडलेल्या एका गाईची सजग नागरिक आणि लाईफ केअर ॲनिमल संघटनेच्या तत्परतेने सुखरुप डिलिव्हरी करुन तिचे प्राण वाचवण्यात यश आले.लक्ष्मी कॉलनी भागात गेल्या काही दिवसांपासून भटकत असलेल्या एका गाईला मंगळवारी (ता.16) सकाळी प्रसव वेदना सुरु होत्या. गाय अत्यवस्थ झाली होती. काही वेळात तिची डिलिव्हरी झाली. मात्र तिचे मायांग बाहेर पडल्याने आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने गाय दगावते की काय अशी भिती होती.

वाचा - मित्राच्या लग्नाची चालली होती वरात, गाणं होतं झिंगाट; पण कठड्याने केला घात

त्याच वेळी येथील रहिवाशी वर्षा जाधव, सुनिता जाधव, पंकज मस्के, सतीश जाधव, आम्रपाली राऊत, तनिष गुंडम, शांताबाई दिवेकर, निर्मलाबाई नरवडे, प्रथमेश धारगे तसेच लाईफ केअर ॲनिमल असोसिएशचे सचिव जयेश शिंदे, शिवा अविनाश दाभाडे, संकेत गायकवाड, उदय रगडे आदींनी गाईला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. खडकेश्वर येथील पशूवैद्यकीय रुग्णालयाला माहिती देण्यात आली. त्यानंतर डॉ. सुरज दाभाडे, डॉ.गणेश चव्हाण, डॉ. आकाश शिंदे यांनी धाव घेऊन गाईवर शस्त्रक्रिया केली. सलाईन लावून योग्य उपचार केले. विशेष म्हणजे कुत्र्यांनी लचके तोडू नये म्हणून नागरिकांनी रात्रभर पहारा दिला. योग्य उपचारामुळे गाय आणि तिचे वासरु दोघेही ठणठणीत आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Today News Residents Run For Cow Safe Delivery