esakal | वीजतार पडून लागलेल्या आगीत वाहनासह देशीदारूचा कोळसा, चालक बालंबाल बचावला

बोलून बातमी शोधा

Aurangabad Latest News}

रस्त्याच्या कडेला विजेचा पुरवठा करणाऱ्या मुख्य खांबावर टेम्पो जाऊन आदळला. यामुळे विद्युत वाहकतारा तुटून टेम्पोवर पडल्या.

वीजतार पडून लागलेल्या आगीत वाहनासह देशीदारूचा कोळसा, चालक बालंबाल बचावला
sakal_logo
By
संतोष शिंदे

पिशोर (जि.औरंगाबाद) : पिशोर (ता.कन्नड) येथून जवळच असलेल्या डोंगरगाव शेलाटी फाट्यानजीक नाचनवेल रस्त्यावर देशीदारूने भरलेला टेम्पो विजेच्या खांबावर आदळून वीज तार पडून लागलेल्या आगीत वाहनासह संपूर्ण देशीदारूचा कोळसा झाल्याची घटना रविवारी (ता.28) दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी टेम्पोमधून (एमएच 20 डीई 4251) चिंचोली व भराडी येथील दुकानासाठी देशीदारू भरून बाबरा-नाचनवेल रस्त्यावरून जात असताना डोंगरगाव-शेलाटी फाट्यानजीक असलेल्या वळणावर चालक गणेश कळम याचा टेम्पोवरील ताबा सुटला.

वाचा - भयानक! दहा ते 12 रानडुकरांचा एकाच वेळी जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी तरुण आले धावून

रस्त्याच्या कडेला विजेचा पुरवठा करणाऱ्या मुख्य खांबावर टेम्पो जाऊन आदळला. यामुळे विद्युत वाहकतारा तुटून टेम्पोवर पडल्या. खोक्यातील काही बाटल्या फुटलेल्या असल्याने तार पडताच काही क्षणातच दारूने पेट घेतला. चालक कदम याने प्रसंगावधान राखून वाहनातून उडी घेतली. यामुळे चालक बालंबाल बचावला. बघता-बघता संपूर्ण दारूच्या पेट्यासह वाहनाचा कोळसा झाला.

वाचा - 'भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरेंनी नेतृत्व केले तर देशाला मजबूत नेतृत्व मिळेल'

पिशोर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य, सहायक फौजदार माधव जरारे, चालक सरवर पठाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. देशीदारू पुरवठादार नरेंद्र जैस्वाल हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. या आगीत सुमारे दहा लाखांची देशी दारू तसेच टेम्पो असे सुमारे तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल भस्मसात झाल्याचे श्री.वैद्य यांनी सांगितले. पिशोर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

संपादन - गणेश पिटेकर