औरंगाबादचे पाणी तब्बल चारपट महाग

माधव इतबारे
गुरुवार, 9 जानेवारी 2020

औरंगाबाद शहरात तब्बल पाचव्या दिवशी पाणी मिळत असताना नागरिकांकडून 4050 रुपये एवढी पाणीपट्टी वसूल केली जात आहे. राज्यातील इतर शहरांचा विचार केल्यास ही पाणीपट्टी चारपटीने अधिक आहे

औरंगाबाद-शहरात तब्बल पाचव्या दिवशी पाणी मिळत असताना नागरिकांकडून 4050 रुपये एवढी पाणीपट्टी वसूल केली जात आहे. राज्यातील इतर शहरांचा विचार केल्यास ही पाणीपट्टी चारपटीने अधिक आहे, असा आरोप करीत बुधवारी (ता. आठ) औरंगाबाद सामाजिक मंच व पाणीपुरवठाविषयक नागरी कृती समितीतर्फे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाने महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावर महापौरांनी पाणीपट्टी कमी करण्याचा सर्वसाधारण सभेने ठराव घेतल्याची माहिती दिली. 

समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेने पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नागरिकांच्या विरोधामुळे ही योजना गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र पाणीपट्टीत वर्षानुवर्षे वाढ होतच गेली. दुसरीकडे शहरात पाचव्या दिवशी म्हणजेच महिन्याला सहा दिवसच पाणी दिले जाते. त्यामुळे पाणीपट्टीमध्ये करण्यात आलेली वाढ मागे घेण्याची मागणी काही वर्षांपासून सुरू आहे. त्यानुसार महापौरांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी 1800 रुपये एवढी करण्याचा निर्णय घेतला होता. याची प्रशासनातर्फे अंमलबजावणी केली जाईल की नाही, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी उत्पन्न वाढल्याशिवाय पाणीपट्टीत कपात करणे शक्‍य नाही, अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी औरंगाबाद सामाजिक मंच व पाणीपुरवठाविषयक नागरी कृती समितीतर्फे महापालिका मुख्यालयासमोर प्रा. विजय दिवाण, सुभाष लोमटे, ऍड. मनोहर टाकसाळ, डॉ. शेख इक्‍बाल मिन्ने, मधुकर खिल्लारे, अण्णा खंदारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पाणीपट्टीत कपात झालीच पाहिजे, अशी मागणी करीत महापालिका व महापौरांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन निवेदन दिले. यात औरंगाबादचे पाणी चौपट महाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

ही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

नाशिकमध्ये बाराशेच 
पुणे - 1480, नाशिक - 1200, सांगली - 1800, डोंबिवली शहरात वार्षिक पाणीपट्टी 1200 रुपये एवढी घेतली जाते. औरंगाबाद शहरातील नागरिकांना मात्र तब्बल 4050 रुपये मोजावे लागतात. विशेष म्हणजे वरील शहरांमध्ये रोज पाणी दिले जाते. त्यामुळे महापालिकेने वाढीव पाणीपट्टी रद्द करून 1800 रुपये एवढीच पाणीपट्टी घ्यावी, यासह इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. 

जाणून घ्या मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

एक लाख 30 हजार बेकायदा नळ 
महापालिकेच्या दप्तरी एक लाख 10 हजार नळधारक आहेत. त्यातील वीस टक्केच नागरिक पाणीपट्टी भरतात. एक लाख 30 हजार बेकायदा नळ असून, ते नियमित करून घेण्याचे काम प्रशासनाचे आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर राजेंद्र जोशी, मेराज सिद्दीकी, शेख खुर्रम, सुलभा खंदारे, शहाजी भोसले, अशोक रसाळ, देविदास किर्तीशाही, कमलाबाई केदारे, आशा डोके यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad water is four times more expensive