
शॉर्टफिल्मची संकल्पना घरात ऐकवली आणि अवघ्या एक दिवसात 'नियम' नावाचा सामाजिक संदेश देणारा हा लघुपट तयार केला. संपूर्ण लघुपट तयार झाल्यानंतर जेव्हा घरातील लोकांनी पाहिला, तेव्हा ते भारावून गेले आणि त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी आले.
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन आहे. अशावेळी घरात राहून काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु, कोरोनाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आशिष निनगुरकर यांनी घरात राहूनच कोरोनाविषयक सामाजिक संदेश देणारा आणि जनजागृती करणारा ‘नियम’ हा लघुपट तयार केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने या लॉकडाउनच्या काळात अनेक नियम घालून दिले आहेत; पण अनेक जणांकडून या नियमांचे उल्लंघन होताना दिसते. जर नियम पाळले नाहीत तर काय होऊ शकते? हे या लघुपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. यासाठी आशिष यांनी मोबाईल हा कॅमेरा, कुटुंब हेच कलाकार आणि घर हेच 'लोकेशन' वापरून,'नियम' हा लघुपट निर्मित केला आहे.
एकाच दिवसात तयार
याबाबत आशिष यांनी सांगीतले, की शॉर्टफिल्मची संकल्पना घरात ऐकवली आणि अवघ्या एक दिवसात 'नियम' नावाचा सामाजिक संदेश देणारा हा लघुपट तयार केला. संपूर्ण लघुपट तयार झाल्यानंतर जेव्हा घरातील लोकांनी पाहिला, तेव्हा ते भारावून गेले आणि त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी आले.
HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा
‘नियम’साठी आशिष यांची पत्नी किरण, वडील अशोक, आई जयश्री, चुलतभाऊ स्वरूप कासार यांनी भूमिका साकारल्या आहेत. ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ आणि ‘नियम पाळा, कोरोना टाळा’ अशा सामाजिक आशय मांडणाऱ्या 'नियम' या लघुपटातून लोकप्रबोधन होईल, अनेकजण योग्य रीतीने आपल्या आरोग्याची काळजी घेतील व 'नियम' पाळतील असा विश्वास आशिष निनगुरकर यांनी व्यक्त केला.
अशी आहे कथा
आजकालची पिढी पालकांच्या गोष्टी ऐकत नाही. त्यांना असे वाटते, की आपण जास्त शिकलो आहे. या लघुपटातील मुलगा लॉकडाउनच्या काळात बिनधास्त घराबाहेर जातो, तेव्हा मास्क घालत नाही. घरात आल्यानंतर हातपाय धूत नाही. आईवडिलांनी याबाबत सूचना दिल्यातर काहीही होत नाही असे प्रतिउत्तर देतो. त्याच्या या हलगर्जीपणामुळे व लॉकडाउनचे नियम न पाळल्यामुळे ‘कोरोना’ त्या घरात येऊन पोचतो.
क्रिकेटपूर्वी सचिनने केलेय या चित्रपटात काम
वयाने जास्त असलेल्या त्याच्या आईवडिलांना त्या विषाणूचा विळखा बसतो. जेव्हा त्याला हे समजते तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. मग पुन्हा हा लघुपट 'रिवाइंड' होतो आणि मूळ पदावर येतो. पायाला ठेच लागल्यानंतर माणूस कसा शहाणा होतो, याचे उत्तम उदाहरण या लघुचित्रपटातून देण्याचा एक प्रयत्न आशिष यांनी केला आहे.