कोण म्हणाले ? ... ज्यांना कोरोनाचा धोका वाटतो त्यांनी निघून जावे! 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 20 मार्च 2020

भाजपचे मधुकर वालतुरे यांनी कोरोनाचा बाबतीत सूचना आहेत, की ६० वर्षांपुढील लोकांना घराबाहेर पडू नका; पण मला काय अवदसा आठवली आलो. मला माझ्यापुरता विषय मंजूर आहे, बाकीच्यांनी बघून घ्यावे. मी माझ्या सुरक्षिततेसाठी जात असल्याचे सांगत सभात्याग केला.

औरंगाबाद - जिल्हा परिषदेत दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याची हातातोंडाशी आलेली संधी ईश्‍वर चिठ्ठीमुळे हुकल्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत राईचा पर्वत केला. 

नोव्हेंबरमधील सभेचा कार्यवृत्तांत कायम करण्याच्या मुद्द्यावर आडून प्रशासनाला वेठीस धरले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा न लांबवता सभा लवकर संपवावी यासाठी आग्रह धरणाऱ्या सदस्यांनाच त्यांनी कोरोनाचा ज्यांना धोका वाटतो त्यांनी सभागृहातून निघून जावे असे म्हणत त्रागा केला. त्यांच्या आडमुठेपणामुळे भाजपचे ज्येष्ठ सदस्य सभा लवकर संपेल म्हणून आलो; पण ही चर्चा लांबतच जात आहे म्हणत त्यांनी सभात्याग केला. 

जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली (ता.२०) सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दहा ते पंधरा मिनिटांत सभेचे कामकाज आटोपण्याचा प्रशासन आणि सदस्यांचा प्रयत्न होता; पण विषयपत्रिकेतील कार्यवृत्तांताला मंजुरी देण्यापूर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी अक्षरश: सभागृहाला वेठीस धरले. 

वारंवार विनंती करून, कोरोनाचे कारण देत आपले म्हणणे थोडक्यात मांडा अशी सदस्य आणि अधिकाऱ्यांनी केलेली विनंती करून देखील डोणगावकर यांनी त्यांचा मुद्दा मांडणे सुरूच ठेवले. 

सिंचन विभागाचे पाच ते सहा कोटींचे दायित्व होते, त्यासाठी तरतूद करण्याचा प्रस्ताव दिला होता, अर्थसंकल्पात तरतूद का केली नाही, याला कोण जबाबदार आहे, असे त्यांनी विचारले. त्यावर लेखा व वित्त विभागाच्या अधिकारी अप्पासाहेब चाटे यांनी संबंधित विभागाकडून जशी मागणी येते त्यानुसार ते एकत्रित करून त्याचा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी ठेवतो असे सांगितले. याउपरही डोणगावकर यांचे समाधान झाले नाही, ती संचिका सभागृहात मागवा असा धोशा लावला. सात दिवसात त्यांना लेखी उत्तर दिले जाईल असे सांगण्यात आले; मात्र त्यांनी लगेच दुसरे मुद्दे उपस्थित करणे सुरू केले. 

मॅडमचा पारा चढला 

प्रोसिडिंगच्या प्रती स्वाक्षरित का करून दिल्या, नवीन नियम झाले का, जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीच्या सभेत १० ते १२ वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करायला वेळ का दिला नाही, याचे उत्तर द्या अशी सरबत्ती करत सभेचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मोर्चा वळवला. आधीच १० ते १५ मिनिटांत सभा संपवण्याचा प्रयत्न असताना ती लांबल्यामुळे सगळे सदस्य, अधिकारी वैतागले होते. 

डोणगावकर यांना ‘मॅडम सांगतो ना’ असे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळताच अचानक त्यांचा पारा चढला आणि ‘आवाज चढवून बोलू नका’ असा चक्क दम त्यांनी भरला, यामुळे सभेतील वातावरण चांगलेच तापले. 

मला काय अवदसा आठवली अन् आलो.. 

अनेक सदस्य वारंवार ‘मॅडम कोरोनामुळे सभा आपल्याला लवकर संपवायची आहे’ अशी आठवण करून देत होते. रमेश पवार यांनी कोरोनामुळे सभा लवकर आटपावी. सदस्यांनी लेखी म्हणणे नंतर अध्यक्षांकडे द्यावे असे म्हणताच त्यांच्यावरही त्या भडकल्या. ज्यांच्या जिवाला कोरोनाचा धोका वाटतो त्यांनी निघून जावे असा उपदेशाचा डोस पाजला. 

भाजपचे मधुकर वालतुरे यांनी कोरोनाचा बाबतीत सूचना आहेत, की ६० वर्षांपुढील लोकांना घराबाहेर पडू नका; पण मला काय अवदसा आठवली आलो. मला माझ्यापुरता विषय मंजूर आहे, बाकीच्यांनी बघून घ्यावे. मी माझ्या सुरक्षिततेसाठी जात असल्याचे सांगत सभात्याग केला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा   

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Zilha Parishad General Body Meeting News