esakal | दहा वर्षांच्या मुलाने बनवला झेडपी अध्यक्ष : पहा Video
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

झेडपीचा अध्यक्ष ठरवणाऱ्या समर्थ मिटकर या विद्यार्थ्याला बोलावण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्षा मीना शेळके यांनी स्वतःच्या टेबलवर बसवून समर्थचा जंगी सत्कार केला. त्याला 500 रुपये बक्षीसही दिले.

दहा वर्षांच्या मुलाने बनवला झेडपी अध्यक्ष : पहा Video

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : दोन दिवसांपासून सुरू असलेच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यावर शनिवारी (ता. 4) अखेर दहा वर्षांच्या विद्यार्थ्याने पडदा टाकला. समर्थ मिटकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. याच विद्यार्थ्याने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरवला आहे. 

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या राज्यभर गाजलेल्या निवडणुकीत भाजप, सत्तार पुरस्कृत उमेदवार, बंडखोर विद्यमान अध्यक्ष ऍड. देवयानी डोणगावकर आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार मीना शेळके यांच्यात लढत होती. मात्र, दोघींनाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समसमान 30-30 मते पडली. 

आता काय करायचे, असा प्रश्‍न असताना चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. एका शाळकरी मुलाला चिठ्ठी काढण्यासाठी बोलविण्यात आले. त्यात महाविकास आघाडीच्या मीना शेळके यांची चिठ्ठी निघाली. या निवडचा खरा हिरो ठरला, तो सरस्वती भुवन प्राथमिक शाळेचा अवघ्या दहा वर्षाचा विद्यार्थी समर्थ संजय मिटकर. 

ईश्‍वरी चिठ्ठी काढण्यासाठी जिल्हा परीषदेजवळच असलेल्या सरस्वती भुवन प्रशालेतील अवघ्या दहा वर्षांच्या समर्थला आणण्यात आले. समर्थच्या हाताने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये मीना शेळके या महाविकास आघाडीच्या उमेदवार यांचे नाव निघाल्याने अध्यक्षपदासाठी त्या विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

समर्थचा केला सत्कार 

झेडपीचा अध्यक्ष ठरवणाऱ्या समर्थ मिटकर या विद्यार्थ्याला बोलावण्यात आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंग राजपूत, माजी आमदार कल्याण काळे, नामदेव पवार, अनिल पटेल यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित अध्यक्षा मीना शेळके यांनी स्वतःच्या टेबलवर बसवून समर्थचा जंगी सत्कार केला. त्याला 500 रुपये बक्षीसही दिले.

यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परीषदेत मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. 

वाचा - यावर संजय राऊत काय म्हणाले?