esakal | अंडी उबवणुक केंद्रात आता कावेरी जातीची पिलं 
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : पडेगाव येथील मध्यवर्ती अंडी उबवणुक केंद्रात जन्मलेली कावेरी जातीचा पिलं

सध्या या केंद्रात कमी खुडूक होणाऱ्या " ग्रामप्रिया' जातींच्या पिलांची पैदास करून कुक्कुटपालन करू इच्छिणाऱ्यांना व शासकीय योजनातील लाभार्थ्यांना शासकीय दरात विकण्यात येतात. 

अंडी उबवणुक केंद्रात आता कावेरी जातीची पिलं 

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद - पशुसंवर्धन विभागाच्या पडेगांव येथील मध्यवर्ती अंडी उबवणुक केंद्रात येत्या ऑगस्टपासून कावेरी जातीच्या कोंबडीची पिलं आणि अंडी मिळणार आहेत. 
या जातीच्या कोंबड्या वर्षाला १८० ते २०० अंडी देतात यामुळे या जातीच्या कोंबड्या शेतीला जोडधंदा तर गरजू कुटूंबाना अर्थिकदृष्टया चांगले पाठबळ देणाऱ्या ठरणार आहेत.

दोन दिवसांपुर्वीच या केंद्रात कावेरी जातीच्या ६ हजारांहून अधिक पिलं अंड्यातुन बाहेर आली. मराठवाड्यात ही जात पहिल्यांदाच या केंद्रातुन उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पडेगाव येथील या केंद्रातुन कुक्कुट पालन व्यवसाय करण्यासाठी इच्छूकांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी शासकीय दरात एक दिवसाची पिल्ले उपलब्ध करून दिली जातात. सध्या या केंद्रात कमी खुडूक होणाऱ्या " ग्रामप्रिया' जातींच्या पिलांची पैदास करून कुक्कुटपालन करू इच्छिणाऱ्यांना व शासकीय योजनातील लाभार्थ्यांना शासकीय दरात विकण्यात येतात. 

हेही वाचा : आरटीई प्रवेश : पालकांना कधी येणार एसएमएस वाचा... 

कावेरी जातीची सहा हजार पिलं तयार 

मध्यवर्ती अंडी उबवणुक केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. के. ए. पटेल यांनी सांगीतले, कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा सुधारीत जातीच्या कोंबडीची पिलं उपलब्ध करुन देण्याचा सतत प्रयत्न असतो. यासाठीच " कावेरी ' जातीची पिलं उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. 

या कोंबड्यांचे मांस खाण्यासाठी गावरानसारखे चवदार असते. अंडी दिसायला आणि चवीला गावरानसारखी आहेत. साधारणत: या कोंबड्या वर्षभरात १८० ते २०० अंडी देतात. अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्ही उद्देशासाठी ही जात फायदेशीर आहे. बेंगलोर येथील सीपीडीओ या केंद्रीय संस्थेतुन " कावेरी ' जातीच्या कोंबडीची ८ हजार अंडी आणली होती.

 वाचून तर बघा : इच्छूकांनी सुरू केली कार्यालये, पत्रकेही वाटली, आता खर्च तीनपट 

कोंबडीशिवाय म्हणजे इन्क्युबेटरमध्ये ही अंडी उबवण्यात आली. दोन दिवसांपुर्वीच यातुन ६ हजाराहुन अधिक पिलं बाहेर आली आहेत. नवीन पिलांच्या आगमनाचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रशांत चौधरी, या केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. पटेल, डॉ. अरविंद चव्हाण, डॉ. चंदेल, डॉ. देवरे, डॉ. रमाकांत शितळे, डॉ. संदीप राठोड, डॉ. एस.बी.गारे उपस्थित होते 

पिलांपासून केली जाणार वाढ 

सध्या तयार झालेल्या पिलांपैकी मादी पिलं अंड्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यापासून आणखी पक्षी आणि अंडी तयार करणात येतील. तर १५ टक्के नर पिल्लं वाढऊन त्यांना बॉयलर म्हणुन विकली जाणार आहेत. तर उर्वरीत नर एक दिवसाची पिलं विकले जातील. सध्याच्या पिलांपासून तयार नवीन पिलं तयार झाल्यानंतर एक दिवसाची पिलं कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्यांना शासकीय दरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 

ग्रामपिया जातीची पिलं व अंडी जुलैपर्यंत मिळतील यानंतर कावेरीची पिलं आणि अंडी या केंद्रात उपलब्ध होतील असे डॉ. पटेल यांनी सांगीतले. 

क्‍लिक करा : सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालय सुनेसुने 
 

go to top