बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘एम.फिल’ प्रवेशासाठी उद्या ‘सीईटी’

संदीप लांडगे
Thursday, 19 November 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘एम.फिल.’च्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी एक हजार १७४ विद्यार्थ्यांनी ‘सीईटी’ ऑनलाइन नोंदणी केली आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘एम.फिल.’च्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी एक हजार १७४ विद्यार्थ्यांनी ‘सीईटी’ ऑनलाइन नोंदणी केली आहे. एम.फिल. सीईटी ही येत्या शुक्रवारी (ता.२०) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १८ विभागांत एम.फिल. अभ्यासक्रम चालविला जातो. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, गणित, कॉमर्स, पाली अ‍ॅण्ड बुद्धिझम, उर्दू, ग्रंथालय व माहितीशास्त्र, संगणकशास्त्र, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र, जर्नालिझम, एमबीए आदी १८ विभागांचा समावेश आहे.

एम.फिल. ‘सीईटी’साठी १ ते १० नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. एकूण एक हजार १७४ जणांनी नोंदणी केली आहे. यामध्ये राज्यशास्त्र विभागातील सर्वाधिक नोंदणी केली आहे. मराठी, इंग्रजी, इतिहास अर्थशास्त्र, समाजशास्त्र, वाणिज्यशास्त्र या अभ्यासक्रमांना प्रत्येकी ५० हून अधिक नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन मॉक टेस्ट घेण्यात येत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाची अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी सीईटीसाठी पात्र आहेत. २० नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने सीईटी घेण्यात येईल. २१ नोव्हेंबर रोजी लगेच निकाल घोषित करण्यात येईल, अशी माहिती पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Babasaheb Ambedkar Marathwada University's Mphil CET On Tomorrow Aurangabad News