esakal | औरंगाबादेत कोरोनाचे रुग्ण घटले पण मृत्यूदर कायम, प्रशासन हतबल
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस कमी होत असले तरी मृत्यूदरात मात्र अद्याप दिलासा मिळालेला नाही.

औरंगाबादेत कोरोनाचे रुग्ण घटले पण मृत्यूदर कायम, प्रशासन हतबल

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद :  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस कमी होत असले तरी मृत्यूदरात मात्र अद्याप दिलासा मिळालेला नाही. शहराचा कोरोनाचा मृत्युदर ३.००९ एवढा कायम आहे. सध्या शहरात सरकारी व खासगी रूग्णालयात ५९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून रोजचे ५० ते ६० रूग्ण आढळून येत आहेत.

कोविड चाचणी नाही तर शिक्षकांना शाळेत 'एन्ट्री' नाही 

रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्याच्या तुलनेत शहराचा मृत्युदर ३.००९ एवढा कायम आहे. जिल्हयाचा मृत्युदर २.३ तर राज्याच्या २.६ आहे. महापालिकेच्या प्राप्‍त अहवालानुसार, सध्या शहरात घाटी व जिल्हा सामान्य रूग्णालय, मेल्ट्रॉन कोविड सेंटर, महापालिकेचे विविध कोविड केअर सेंटर्स व खासगी रुग्णालयांत ५९४ सक्रिय रूग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ४४७ रूग्ण हे शहरातील असून १३२ रूग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तर १५ रूग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.

३९ जण होम आयसोलेशनमध्ये
रुग्ण संख्या जास्त असताना प्रशासनाने कमीत कमी जणांना होम आयसोलेशनची सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शासनाच्या नवीन निर्देशानुसार सौम्य लक्षणे असलेल्या, तसेच कोरोनाची लक्षणे नसलेल्या रूग्णांसाठी होम आयसोलेशन म्हणजेच घरीच उपचार घेण्यास मुभा देण्यात आली. सध्या ३९ जण घरीच राहून उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनसाठी घरांत स्वतंत्र बेडरूम, स्वतंत्र बाथरूम असणे तसेच डॉक्टराने उपचारासाठी हमी घेणे अनिवार्य आहे.

संपादन - गणेश पिटेकर

go to top