औरंगाबादेत गर्भवती कुत्रीच्या डोहाळे जेवणाचा आगळा-वेगळा सोहळा रंगला, पाहुण्यांनी लावली हजेरी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 December 2020

गर्भवती महिलेचे डोहाळे जेवण मोठ्या थाटात साजरे करण्यात येते. याच प्रमाणे स्टफी या गर्भवती कुत्रीच्या डोहाळे जेवणाचा आगळा-वेगळा कार्यक्रम रविवारी (ता.२७) रंगला.

औरंगाबाद  : गर्भवती महिलेचे डोहाळे जेवण मोठ्या थाटात साजरे करण्यात येते. याच प्रमाणे स्टफी या गर्भवती कुत्रीच्या डोहाळे जेवणाचा आगळा-वेगळा कार्यक्रम रविवारी (ता.२७) रंगला. औरंगाबाद येथील संतोषी मातानगर, नारळीबागमधील मयूरी अशोक जाधव या विद्यार्थिनीचा मुक्या प्राण्यावर असेलेल्या प्रेमापोटी हा डोहाळे जेवणाचा सोहळा आयोजित करण्यात आला. यासाठी घराची सजावट केली. पाहुणे मंडळींना निमंत्रित करून मोठा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. नारळीबाग भागात राहणाऱ्या २३ वर्षीय मयुरीच्या घरात एक साडेतीन वयोवर्ष असलेली 'स्टफी' नावाची कुत्री आहे.

 

 

 
 

जाधव कुटुंबातील एक सदस्य असलेल्या स्टफीची प्रत्येक गरज मयूरी पूर्ण करीत आहेत. ती या घराची लाडकी असून तिचा प्रत्येक वाढदिवस अशाच प्रकारे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्याच प्रमाणे तिचा डोहाळ्याचा कार्यक्रमासाठी घराची आकर्षक अशी सजावट केली होती. झेंडुच्या फुलाने पाळणा सजविण्यात आला होता. घरासमोर काढलेली आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. पाहुण्यांना निमंत्रणासाठी डिजिटल अशी पत्रिकाही तयार करण्यात आली होती. स्टफी गर्भवती असल्याचे कळल्यानंतर या परिवाराने फटाके फोडत आनंद साजरा केला होता. स्टफीचा दुसऱ्या महिन्यात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचेही मयुरीने सांगितले. या कार्यक्रमासाठी मयुरीची आई मिना पूर्ण परिवाराने सहकार्य केले.

 

 

 

प्राण्यांनाही मन असते. भावना असतात. या भावनेतून गर्भवती स्त्रियांचे ज्या प्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो. त्याप्रमाणे स्टफीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी आम्ही घरासमोर आकर्षक रांगोळी, रंगोळीमध्ये कोणीतरी येणार येणार गं... असे गाण्याच्या ओळी लिहून नवीन पाहुण्यांची आतुरता व्यक्त केली. घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहेत.
- मयुरी जाधव

 

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baby Shower Of Pregnant Female Dog Celebrated Aurangabad News