
निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव डावलण्यात आल्यामुळे भाजप चांगलेच आक्रमक झाली आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद शहर स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामांचा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी (ता.१६) लोकार्पण सोहळा होत आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव डावलण्यात आल्यामुळे भाजप चांगलेच आक्रमक झाली आहे. कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा महापालिकेशी संबंध नसतानाही त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत घेण्यात आले आहे.
मात्र रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघातील काही भाग हा महापालिकेच्या हद्दीत येतो, असे असतानाही दानवे यांचे नाव डावलण्यात आले आहे. त्यामुळे या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाकडे आम्ही जाणार नसल्याचे आमदार अतुल सावे यांनी सांगितले. श्री.सावे म्हणाले की, शिवसेनेतर्फे जुन्या कामांचे नव्याने उद्घाटन करण्यात येत आहे. आज शहरात कचरा प्रक्रियेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८८ कोटी रुपये दिले होते. त्याचा आता दुसऱ्यांदा उद्घाटन होत आहे.
तसेच माननीय मुख्यमंत्री यांनी १२ डिसेंबर रोजी तीन कामांचे उद्घाटन केले. त्यातील एकही काम सुरू झाले नाही. पाणीपुरवठ्याची वर्कऑर्डर दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापही वर्कऑर्डर देण्यात आली नसल्याचे ठेकेदारांनी सांगितले. उलट ३०० कोटी रुपये वाढवून द्यावे असे काम करणाऱ्या ठेकेदारांनी सांगितले. यासह सफारी पार्क, बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे कामही अद्याप झालेले नाही. ही कामे सुरू होण्याअगोदरच आज परत सात कामांचे लोकार्पण होत आहे.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा
आज लसीकरणाचे कामेही होत आहे. अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या जाहिराती लावण्यात आले आहे. मात्र यात लसीकरण याचा साधा उल्लेखही प्रशासनाने केलेला नाही. शहरात चार मंत्री असताना लसीकरणाला महत्त्व दिले गेलेले नाही. म्हणून या कार्यक्रमाला आम्ही जाणार नसल्याचे आमदार अतुल सावे यांनी सांगितले. खासदार भागवत कराड म्हणाले की संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस आहे. शहराचे नाव संभाजीनगर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. म्हणून भाजपच्या युवा मोर्चातर्फे जिथे जिथे लव्ह औरंगाबादचे फलक लावण्यात आले आहे. त्या ठिकाणी नमस्ते संभाजीनगरचे बॅनर आम्ही लावले आहे.
मात्र प्रशासनाने ही बॅनर काढून टाकली. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहरात अनेक बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र ही अनधिकृत बॅनर्स आहेत. ते काढण्यात आलेली नाही. त्यांची चौकशी झाली पाहिजे. संपूर्ण देशात लसीकरणास सुरवात असताना त्याबाबत एकही लोकप्रतिनिधी महत्त्व देत नाही. असा आरोप खासदार कराड यांनी केला आहे.
Edited - Ganesh Pitekar