शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजपतर्फे नमस्ते संभाजीनगरची मोहीम, औरंगाबादेत लावले फलक

प्रकाश बनकर
Saturday, 16 January 2021

भाजपच्या भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पहाटे पाच वाजेपासूनच शहरातील वेगवेगळ्या भागात नमस्ते औरंगाबादचे फलक लावण्यात आले.

औरंगाबाद : औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावेत या या मागणीसाठी भाजप चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे लव्ह औरंगाबाद व सुपर संभाजीनगरचा वाद सुरू असताना आज भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शहरात लव औरंगाबाद लिहिलेल्या ठिकाणी नमस्ते संभाजीनगरचे फलक लावून शिवसेनेला डिवचण्याचा  प्रयत्न करण्यात आला आहे.

भाजपच्या भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पहाटे पाच वाजेपासूनच शहरातील वेगवेगळ्या भागात नमस्ते औरंगाबादचे फलक लावण्यात आले. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण करण्यासाठी भाजपतर्फे हे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याविषयी अनेक वेळा निवेदनही देण्यात आली आहेत. दरम्यान याच विषयावरून शिवसेना-भाजप आमने-सामने आले होते.

युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राजगौरव वानखेडे व त्यांच्या टीमने हे नमस्ते संभाजीनगर चे बॅनर सर्वत्र लावले. राजगौरव वानखेडे म्हणाले की, आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन तसेच लव्ह औरंगाबादचे उद्घाटन करण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे शहरात येत आहेत. त्यांना संभाजीनगर आठवण करून देण्यासाठी  हे बॅनर आम्ही लावले आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नाव करण्याची घोषणा केली होती. त्यास  तीस वर्षे झाली तरीही शहराचे नाव संभाजीनगर झालेले नाही. त्यामुळे आम्ही शहरभर नमस्ते संभाजीनगर असे नामकरण करून याची शिवसेनेला सातत्याने आठवण करून देत राहू असेही राजगौरव वानखेडे यांनी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Starts Namaste Sambhajinagar Compaign Aurangabad Latest News