भाजप शहराध्यक्षाची निवड पुन्हा लांबणीवर

प्रकाश बनकर
मंगळवार, 7 जानेवारी 2020

भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेत सक्षम अशा नेत्याला शहराध्यक्षपद दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपतर्फे दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका घेण्यात येतात. यातून गावपातळीपासून ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंतच्या निवडीचा कार्यक्रम घेतला जातो. 

औरंगाबाद : भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षाची निवड ही पाच किंवा सहा जानेवारीला घेण्यात येणार होती; पण जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षच्या निवडणुकीमुळे ही निवड लांबणीवर टाकण्यात आली. या निवडीपूर्वी 10 व 11 जानेवारीला मंडळ अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यानंतरच पुढील आठवड्यात शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची निवड होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांनी दिली. 

भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे शहराध्यक्ष पदासाठी संजय केणेकर, शिरीष बोराळकर, आमदार अतुल सावे, बसवराज मंगरुळे आणि अनिल मकरिये यांच्या नावांची चर्चा आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेत सक्षम अशा नेत्याला शहराध्यक्षपद दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपतर्फे दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका घेण्यात येतात. यातून गावपातळीपासून ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंतच्या निवडीचा कार्यक्रम घेतला जातो. 

वाचा - पत्नीला पाठवले नाही, सासूला जिवंत जाळले

मंडळ अध्यक्षांची निवडीशिवाय शहराध्यक्ष  निवड नाही

यंदा विधानसभा निवडणुका आल्यामुळे संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा विभागाची जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व विविध पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी मराठवाड्यातील इतर ठिकाणीही शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच अध्यक्ष निवडला जाणार होता; मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही.

ही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

13 किंवा 17 जानेवारीला निवड

महापालिकेच्या उपमहापौर, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवड झाल्यानंतर आता नवीन अध्यक्षांची निवड केली जाणार, असे सांगण्यात येत होते; मात्र आता मंडळ अध्यक्षांची निवड झाल्याशिवाय शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची निवड होणार नाही. ही निवड 13 किंवा 17 जानेवारीला भाजपचे जिल्हा निवडणूक अधिकारी आमदार अतुल भातखळकर करणार आहेत.

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही 

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने जबाबदारी 
पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप शहराध्यक्षाची निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निवडणुकीत युती राहणार नाही. त्यामुळे भाजपला स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यानुषंगाने शहराध्यक्षाची जबाबदारी महत्त्वाची ठरणार आहे. निवडणूक होईपर्यंत भाजप महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे तिथेही विरोधकाची भूमिका सक्षमपणे मांडण्याची जबाबदारीही शहराध्यक्षांच्या खांद्यावर असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP City President Re-Election Delayed