
बीड जिल्ह्यात माहेरी असलेल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी जावई दारूच्या नशेत आल्याने सासूने पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात सासूला मारहाण करून अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
अंबाजोगाई (जि. बीड) - माहेरी असलेल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी जावई दारूच्या नशेत आल्याने सासूने पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात सासूला मारहाण करून अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (ता. तीन) तालुक्यातील गिरवली येथे घडली. याप्रकरणी जावई प्रशांत ऊर्फ महादेव दिगंबर करपे (रा. जवळबन, ता. केज) याच्याविरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
गिरवली येथील शहाजी आपेट यांच्या मुलीचा विवाह जवळबन येथील प्रशांत करपे याच्यासोबत झालेला आहे. सुरवातीला दोघांचा संसार सुखाचा झाला. नंतर, प्रशांतला दारूचे व्यसन जडले. तो पत्नीला मारहाण करू लागला. या त्रासाला वैतागून ती गिरवली या माहेरी आली. काही दिवसांपासून ती गिरवली येथेच राहत होती.
हेही वाचा - ...आणि त्याच्या डोक्यावरून गेले जेसीबीचे चाक
शुक्रवारी प्रशांत करपे सासरवाडीत गेला व पत्नीस सोबत चल म्हणू लागला. मात्र, जावई दारूच्या नशेत असल्याने पत्नी व सासू रमाबाई आपेट यांनी नकार दिला. त्यामुळे प्रशांतचा पारा चढला. त्याने सासू रमाबाईला शिवीगाळ करून दगडाने मारहाण करून जखमी केले. खाली पडल्यानंतर अंगावर रॉकेल टाकून पेटवण्यासाठी काडी ओढण्याचा प्रयत्न करत असताना काहींनी त्यास पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
हेही वाचा - एसटी महामंडळाची हिटलरशाही
याबाबत सासू रमाबाई शहाजी आपेट यांनी बर्दापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत ऊर्फ महादेव दिगंबर याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक एल. व्ही. केंद्रे तपास करीत आहेत.