हर्षवर्धन जाधव विरुद्ध संजना जाधव, कोण मारणार बाजी? आदित्यने पॅनल तयार करून लढवलाय किल्ला...

संतोष शिंदे
Friday, 15 January 2021

राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यापासून पिशोर ग्रामपंचायत चर्चेत आली आहे.

पिशोर  (जि.औरंगाबाद) : राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यापासून पिशोर ग्रामपंचायत चर्चेत आली आहे. बुधवारी (ता.13) संध्याकाळी पाच वाजता निवडणूक प्रचाराचा धुरळा खाली बसला. सहा प्रभागाच्या एकूण सतरा जागांसाठी एकूण पाच पॅनलचे 80 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

हर्षवर्धन जाधव समर्थक कै. रायभानजी जाधव ग्राम विकास पॅनल, संजनाताई जाधव समर्थक ग्रामविकास पॅनल, माजी सरपंच पुंडलिक डहाके यांचे शिवशाही ग्राम विकास पॅनल, माजी सरपंच नारायण मोकासे यांचे लोकशक्ती ग्रामविकास पॅनल आणि राजेंद्र मोकासे व माजी उपसरपंच नारायण जाधव यांचे आदर्श परिवर्तन ग्रामविकास पॅनल अशी एकूण पंचरंगी चुरशीची लढत या वेळी पहावयास मिळत आहे. 

सणासुदीच्या काळात नायगावसह पाडोळी, बोरगावमधील वीज पुरवठा खंडीत

पाच पॅनलचे उमेदवार-

माजी सरपंच नारायण मोकासे यांच्या लोकशक्ती विकास पॅनल व पुंडलिक डहाके यांच्या शिवशाही विकास पॅनेलने संपूर्ण सतरा जागांसाठी, माजी उपसरपंच नारायण जाधव व राजेंद्र मोकासे यांच्या आदर्श परिवर्तन ग्राम विकास पॅनल व कै. रायभानजी जाधव ग्राम विकास पॅनल यांनी सोळा जागांसाठी आणि बाळासाहेब जाधव यांच्या संजनताई जाधव समर्थक पॅनलने आठ जागांसाठी उमेदवार दिलेले आहेत. या सोबत सहा उमेदवार अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत.

आईविरुद्ध मुलाच्या पॅनलने वेधले राज्याचे लक्ष-

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजनाताई जाधव आणि श्री. दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे पॅनल समोरासमोर असल्याने सुरुवातीला संपूर्ण राज्याचे लक्ष या ग्रामपंचायतीकडे वेधले गेले होते. 

Gram Panchyat Election: निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, कोरोनामुळे विषेश काळजी

प्रचार रॅली व सभा ठरल्या लक्षवेधक-

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवशाही ग्रामविकास व आदर्श परिवर्तन ग्रामविकास या दोन्ही पॅनलने गावात काढलेल्या प्रचार रॅलींनी सर्वांचे लक्ष वेधले होते. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे पुत्र आदित्यवर्धन जाधव, माजी सरपंच पुंडलिक डहाके आणि जिल्हा परिषदेची शिक्षकाची नोकरी सोडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले राजेंद्र मोकासे व प्राचार्य नारायण जाधव यांच्या प्रचार सभांनी चांगलीच गर्दी खेचली.

"हे" मुद्दे राहिले चर्चेत.- 

अंजना पळशी धरण दीड किलोमीटर अंतरावर असून सुद्धा संपूर्ण गावाच्या शुद्ध व नियमित पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याचा प्रश्न, गावातील अस्वच्छता, पक्के सिमेंट रस्ते, वीज, आरोग्य, ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता, जुन्या नेतृत्वाला नवीन पॅनल द्वारे उपलब्ध झालेले नेतृत्वाचे नवीन पर्याय, आईच्या पॅनल विरुद्ध मुलाने दिलेले पॅनल, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची अटक, माळी, मराठा, मुस्लिम व इतर जातीपातीचे गणित आदी मुद्दे या निवडणुकीत चर्चेला राहिले.

हरणाच्या पाडसाला जीवदान! गावकऱ्यांची तत्परता

सख्खे नातेवाईक एकमेकांच्या विरोधात-

प्रभाग क्रमांक एक मध्ये तीन पॅनल प्रमुख एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. याच प्रभागात आजी विरुद्ध नात, प्रभाग क्रमांक चार मध्ये आत्या विरुद्ध भाची, प्रभाग क्रमांक पाच मध्ये काकू विरुद्ध पुतणी अशा तुल्यबळ व लक्षवेधक लढती होणार आहेत. 

डिजिटल प्रचारावर जोर-

यावेळी ऑडिओ, व्हिडीओ द्वारे डिजिटल प्रचारावर बहुतेक उमेदवारांचा व पॅनलचा भर दिसून आला. या प्रकारच्या प्रचार तंत्रात अत्यल्प किंवा कोणताही खर्च न करता प्रचार करण्याचे तंत्र ग्रामीण भागात लोकप्रिय झाल्याचे चित्र सगळीकडे दिसले. 
संजनताई जाधव यांची रेकॉर्ड केलेली मतदान करण्यासाठी प्रत्यक्ष मतदात्यांना मोबाईल द्वारे केलेले आवाहन यात विशेष ठरले.

मतदात्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने उमेदवार व कार्यकर्ते घरोघर भेट देऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहे. आता अठरा तारखेला कोणते पॅनल भारी आणि कोण ठरतो गावचा कारभारी याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election harshvardhan jadhav sanjana jadhav aditya raosaheb danave