..त्या बसमधून दिल्लीतील विद्यार्थ्यांना आणा - मयुर सोनवणे

अतुल पाटील
Sunday, 26 April 2020

केंद्र सरकारच्या मध्यस्थीनंतर राज्य सरकारने नांदेड येथे अडकलेल्या यात्रेकरूंना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड येथील हुजूर साहिब गुरुव्दारामध्ये अडकलेल्या यात्रेकरुंना बसमधून दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्ये परत पाठवण्यात येत आहे. याच बसमधून दिल्ली येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याची व्यवस्था होऊ शकते.

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभर ‘लॉकडाऊन’ सुरु आहे. दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे महाराष्ट्रातील जवळपास चार हजार विद्यार्थी तिथे अडकून पडले आहेत. यात मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्याची राज्य शासनाने व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मयूर सोनवणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात मयूर सोनवणे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या मध्यस्थीनंतर राज्य सरकारने नांदेड येथे अडकलेल्या यात्रेकरूंना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड येथील हुजूर साहिब गुरुव्दारामध्ये अडकलेल्या यात्रेकरुंना बसमधून दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्ये परत पाठवण्यात येत आहे. याच बसमधून दिल्ली येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याची व्यवस्था होऊ शकते.

हेही वाचा : परीक्षेसंदर्भात ‘बामू’चा प्लॅन ए, बी, सी तयार

पंजाब सरकारकडून नांदेड येथे अडकलेल्या यात्रेकरूंसाठी १५० बसची व्यवस्था करण्यात आली आहे. ३०० यात्रेकरूंना घेऊन दहा बस नांदेडवरून निघाल्या आहेत. याप्रकारे आणखी १४० बस पुढील दोन आठवडे दिल्ली, पंजाब, हरियाणाकडे जाणार असल्याचे समजते. यातील अनेक बस या हिंगोली जिल्ह्यातील खुराणा ट्रॅव्हल्सच्या आहेत. त्यामुळे त्या बसेस राज्यात रिकाम्याच येणार आहेत.

हेही वाचा : होय! एमआयटीचे तीनशे विद्यार्थी घेतायत ई ग्रंथालयाचा लाभ

आर्थिक कोंडी झाल्याने दिल्ली येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांचे पालकही त्यांना पैसे पाठवू शकत नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी मोठ्या संकटात सापडले आहेत. दिल्ली, पंजाब, हरियाणा येथे गेलेल्या बसमधून दिल्ली येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत राज्यात आणण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी मयूर सोनवणे यांनी केली आहे.

हेही वाचा : ‘बामु’ने बनविले हॅण्ड फ्री सॅनिटायझर डिस्पेंसर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bring Students From Delhi On That Bus Mayur Sonawane