ब्रिटनहून आलेल्या महिलेला सुटी, कोरोना चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह

माधव इतबारे
Thursday, 31 December 2020

ब्रिटनमधून आलेल्या ५७ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली होती. या महिलेच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

औरंगाबाद : ब्रिटनमधून आलेल्या ५७ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली होती. या महिलेच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्याप अहवाल आलेला नाही. असे असतानाच या महिलेची घाटी रुग्णालयात २४ तासाच्या अंतराने दोनवेळा आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

 

 

 

राज्य सरकारने २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने स्वॅब घेतले. १५ डिसेंबरला ब्रिटन येथून शहरात आलेल्या महिलेचा २५ रोजी आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे हा ब्रिटनमध्ये आढळलेला नवा विषाणू आहे का? याची तपासणी करण्यासाठी महिलेच्या लाळेचे नमुने घाटी रुग्णालयातून तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले व महिलेस तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 

 

 

१४ दिवसांचे आयसोलेशन
दरम्यान सोमवारी (ता.२८) घाटी रुग्णालयात या महिलेची २४ तासाच्या अंतराने दोनवेळा आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली. मंगळवारी (ता. २९) रात्री या दोन्ही कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीत महिलेला रुग्णालयातून घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तिला १४ दिवस घरातच आयसोलेशनमध्ये राहावे लागणार असल्याचे डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Britain Returnee Women Corona Negative Aurangabad News