
फुलंब्री तालुक्यातील पानवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोबत असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचा मान राखत फुलंब्री येथील बसस्थानकाजवळ असलेल्या टपरीवर चहा घेतला.
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : तालुक्यातील पानवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोबत असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचा मान राखत फुलंब्री येथील बसस्थानकाजवळ असलेल्या टपरीवर चहा घेतला. तसेच यावेळी त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. या नंतर फुलंब्रीत अब्दुल सत्तार यांच्या ‘चाय पे चर्चा’ चांगलीच रंगली.
शरद पवार कृषी विधेयकावर बोलले; मालाच्या किंमतीची गॅरंटी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध
अब्दुल सत्तार हे मंत्री जरी झाले असले तरी त्यांची काम करण्याची पद्धत सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे आहे. आपल्या पेक्षा वयोवृद्ध व्यक्ती भेटताच त्यांना हात जोडून नमस्कार करणे, लहान मुलांना प्रेमाने जवळ घेणे, कोणताही मान-पान न पाहता सर्वांसोबत जमिनीवर बसून जेवण करणे, एरवी हेलिकॉप्टरमधून नुकसानीची पाहणी करतांना अनेक नेते पाहायला मिळतात.
मात्र शेतात अनवाणी पायांनी फिरून नुकसानीची पाहणी करणारे अब्दुल सत्तार बहुदा एकमेव मंत्री असावेत. अशी अब्दुल सत्तार यांची कार्यपद्धत असल्याने त्यांच्या सोबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा कायम गराडा असतो. फुलंब्री येथे ही असाच एक प्रत्यय आला. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांना चहा घेण्यासाठी आग्रह धरला. यावेळी संपूर्ण ताफा रस्त्यावर थांबवून सत्तार यांनी फुलंब्री येथील टपरी वरच्या बाकावर बसून चहा घेतला. त्यांनतर फुलंब्री येथे याबाबत चर्चेला चांगलेच उधाण आले होते.
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकले सोयाबीन, टोमॅटो, मका, बाजरी
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे , जिल्हा परिषद बांधकाम सभापती किशोर बलांडे, फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत जाधव, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतीश ताठे, नगरसेवक सलिम हुसेन, विनोद भोजवानी, रुउफ कुरेशी, मेहबूब पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संपादन - गणेश पिटेकर