आमदार प्रशांत बंबसह १६ जणांवर गुन्हा दाखल, बनावट दस्तावेज केल्याचा ठपका

0prashant_20bam
0prashant_20bam

गंगापूर (जि.औरंगाबाद) : खोटा व बनावट दस्ताऐवज प्रकरणी आमदार प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांविरोधात बुधवारी (ता.१८) रात्री उशिरा गंगापूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंब यांनी पंधरा कोटी ७५ लाख  ३३ हजार ३३८ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. गंगापूर साखर करखान्याच्या सभासदांची फसवणूक केल्याचा आरोपही आमदार प्रशांत बंबसह १६ जणांवर लावण्यात आला आहे. या प्रकरणी कृष्णा पाटील डोणगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गंगापूर सहकारी साखर कारखाना २००७-२००८ या वर्षापासून  बंद आहे.

राज्य सहकारी बँकेने कर्जवसुलीपोटी कारखाना ताब्यात घेतला. बँकेने कारखाना विक्रीसाठी काढल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाने या विक्री व्यवहाराच्या विरोधात न्यायालयीन कारवाई सुरु केली होती. यासाठी कारखान्याच्या वतीने नऊ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. ही रक्कम कारखान्यास न्यायालयाने परत केली आहे. आतापर्यंत ती रक्कम व्याजासह १५ कोटी ७५ लाख ३३ हजार ३३८ रुपये एवढी झाली आहे. ही रक्कम सात नोव्हेंबर २०२० रोजी कारखान्यास परत मिळाली होती.

कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब व प्रभारी कार्यकारी संचालक बी.एम.पाटील यांनी २० जुलै २०२० रोजी बेकायदेशीररित्या कारखान्याचे खाते उघडले. त्यासाठी कारखान्याने ठराव घेतला होता. तो बनावट व बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. खाते उघडताना कारखाना ही भागीदारी कंपनी असल्याचे दाखविण्यात आले. त्यात बंब व पाटील भागीदार आहेत असा खोटा दस्तावेज निवडला. नागरी सहकारी बँकेत खाते उघडताना सक्षम अधिकाऱ्याची कुठलीही परवानगी घेतली गेली नाही. प्राप्त रकमेतून विविध ठिकाणी नावे वळविण्यात आली. कारखाना ही वित्तीय संस्था नाही. त्यामुळे ती व्याज वाटू शकत नाही. व्याजेच्या नावाखाली अधिकची रकम अपहारासाठी बेकायदेशीरपणे दिली जात असल्याच्या फिर्यादीवरुन आमदार बंब यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com