हृदयद्रावक : वयच काय त्याचं, अवघं दोन वर्ष, अन् आता...

संजय जाधव 
Sunday, 17 May 2020

काही हवं तर रडायचं, मनसोक्त खेळताना पडायचं. पुन्हा दुडूदुडू धावायचं. आई-बाबांजवळ हट्ट धरायचा. झालंच कधी तर मोठ्या ताईशी भांडायचं हेच काय त्याचं विश्व. पण, 'कोरोनासुरा'नं त्यालाही गाठलंच.

कन्नड (जि. औरंगाबाद) : आई-वडिलांच्या खांद्यावर खेळण्याचं, झोपाळ्यावाचून झुलण्याचं त्याचं वय. हे जग काय आहे, आजार-औषधी काय असते हेही त्या कोवळ्या जिवाला अजून पुरतं कळालं नाही. काही हवं तर रडायचं, मनसोक्त खेळताना पडायचं. पुन्हा दुडूदुडू धावायचं. आई-बाबांजवळ हट्ट धरायचा. झालंच कधी तर मोठ्या ताईशी भांडायचं हेच काय त्याचं विश्व. पण, 'कोरोनासुरा'नं त्यालाही गाठलंच. सोबत त्याच्या आईलाही बाधा झाली. आता या मायलेकांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पायाला भिंगरी असलेल्या त्याला एका खोलीत १४ दिवस बंधिस्त राहावं लागणार आहे.  

तालुक्यातील देवळाणा येथील गावातील एका कुटुंबातील चौघांचे काल (ता. १६) सायंकाळी स्वॅब घेण्यात आले होते. आज (ता. १७) त्यांचे रिपोर्ट मिळाले. दुर्दैवाने आईसह दोन वर्षांच्या मुलाला बाधा झाली. पण, त्याच बरोबर वडील आणि मुलीचा अहवाल निगेटिव्ह आला. कन्नड तालुक्यात पहिल्यांदाच कोविड-१९ चे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आईसह त्या दोन वर्षींय बाळावर ग्रामीण रुग्णालयातील कोविड विशेष कक्षात उपचार सुरू आहे. निगेटिव्ह असलेल्या वडील आणि मुलीला कुंजखेडा येथील रुग्णालयात अलगीकरण कक्षात दाखल केले आहे.

दोन दिवसांनी पुन्हा त्यांचा स्वॅब घेऊन तपासणी करणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी सांगितले. दरम्यान, दोन वर्षांच्या त्या बाळाला आता एका कक्षात बंदिस्त राहावे लागणार आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय आता तालुक्यातही कोरोनाचा प्रवेश झाल्याने भीतीचे वातावरण असून, अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे.

हिस्ट्री शोधणार
या कुटुंबीयांच्या रुग्णांच्या प्रवासाचा व भेटीगाठींचा इतिहासाची माहिती प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
 

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित

रंगाबाद येथे 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू
औरंगाबाद येथील जलाल कॉलनीमधील 32 वर्षीय तरुणाचा शनिवारी (ता. 16) रात्री 9 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 15) या युवकास अपघात विभागात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या स्वॅबचा अहवाल घेण्यात आला. तो पॉझिटिव्ह निघाला.
 
पोलिस शिपाई कोरोनामुक्त
औरंगाबाद येथील किलेअर्क येथील रहिवासी तथा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या शिपायास सात मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. या कर्मचार्‍यास उपचारासाठी धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर हा पोलिस शिपाई शनिवारी (ता. 16) कोरोनामुक्त झाला. त्यास सुटी देण्यात आली. या शिपायावर नातेवाईकांनी घरी आल्यावर पुष्पांचा वर्षाव करून स्वागत केले.

 
19 जणांना रुग्णालयात सुटी
एकीकडे कोरोना कहर असताना दुसरीकडे शनिवारी औरंगाबाद 19 जणांना उपचारानतंर सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत औरंगाबाद येथील रुग्णालयात सुटी झालेल्यांची संख्या ही 326 वर पोचली आहे. यात पुंडलिकनगर -3 (पुरुष), दत्तनगर-1 (पुरुष), संजयनगर- 1 (महिला), जयभीमनगर-7 (दोन पुरुष, पाच महिला), कबाडीपुरा-5 (दोन पुरुष, तीन महिला), सावित्रीनगर चिकलठाणा- 1, (महिला), भडकल गेट- 1,  (पुरुष) यांचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
 
 जिल्ह्याचे कोरोना मीटर 

  • उपचार घेणार- 605
  • बरे झालेले - 326
  • मृत्यू झालेले - 27

एकूण- 958
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child's test Positive for COVID-19 at Kannad