esakal | शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात, रावसाहेब दानवेंचा खळबळजनक आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Raosaheb Danve

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात, रावसाहेब दानवेंचा खळबळजनक आरोप

sakal_logo
By
नवनाथ इधाटे

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथे आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण सोहळा बुधवारी (ता.नऊ) पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, पंचायत समिती सभापती सविताताई फुके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, प्रशिक्षणार्थी भारतीय प्रशासकीय अधिकारी (आयएएस) अनमोल सागर, अध्यक्ष दिलीप कोलते, माजी पंचायत समिती सदस्य दामोधर कोलते, तालुका उपाध्यक्ष आप्पासाहेब काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दानवे म्हणाले की, केंद्रीय कृषी कायदा हा शेतकरी हिताचा असून शेतकऱ्यांनी आपला माल आता मार्केट कमिटीतच विक्री केला पाहिजे असे नाही. शेतकरी आपला माल आपल्या मर्जीप्रमाणे कोठेही विक्री करू शकतो. शेतकऱ्यांच्या शेतात व्यापारी जातील व शेतकऱ्यांच्या मर्जीप्रमाणे भाव देतील असा हा केंद्रीय कृषी कायदा आहे. परंतु विरोधक केंद्रीय कृषी कायद्याचा चुकीचा अर्थ काढून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे.

केंद्र सरकारने केंद्रीय कृषी कायदा अंमलात येईल. त्यावेळेस एका वर्षात या केंद्रीय कृषी कायद्याचा फायदा शेतकऱ्यांना समजेल. केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या अनेक योजना अंमलात आणल्यामुळे देशातील शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचे दानवे यांनी सांगितले. यावेळी दामोधर कोलते, ज्ञानेश्वर वहाटुळे, रघुनाथ फुके, उत्तम फुके, परमेश्वर काकडे, बाबासाहेब कोलते, आबासाहेब फुके, अरुण फुके, गणेश तांबे, सुदाम साळुंके, सुनील कोलते, सुभाष कोलते, शरद कोलते, राम कोलते यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर