ज्यांचे चांगले काम त्यांनाच संधी -अतुल सावे

प्रकाश बनकर
Tuesday, 3 March 2020

शहरात पक्षाचे संघटन चांगलेच मजबूत झाले आहे. या संघटनासाठी प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत आहे. किमान महानगरपालिकेचे तिकीट आपल्याला मिळेल, या आशेवर संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नजरा आता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे लागल्या आहेत; मात्र पक्षात काही जागांवर वरिष्ठांच्या मुलांसाठीही फिल्डिंग लावण्यात येत असल्याची कुजबुज सुरू आहे. 
 

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजपतर्फे शहरातील ११५ वॉर्डांची चाचपणी करण्यात येत आहे. भाजपतर्फे या निवडणुकीसाठी अर्ज वाटप प्रक्रिया सुरू आहे. रविवारपर्यंत (ता. एक) ६५० जणांनी अर्ज घेतले आहेत. या निवडणुकीत चांगले काम करणाऱ्यांना संधी असल्याचे भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार अतुल सावे यांनी दिली. 

भाजपतर्फे २६ फेब्रुवारीपासून इच्छुकांसाठी अर्ज वितरण करण्यात येत आहेत. शहरात पाच वर्षांत भाजपचे संघटन मजबूत झाल्यामुळे अनेकजण भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. गेल्या महिन्यापासून भाजपतर्फे मंडळनिहाय बैठका झाल्या. यात बैठकीत २०० जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा पदाधिकाऱ्याकडे बोलून दाखवली होती.

हेही वाचा- भाजपमधील आरोपींपासूनच महिलांना सर्वाधिक धोका

या निवडणुकीत पक्षातील निष्ठावंतांसह नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. उस्मानपुरा येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात इच्छुकांसाठी नावनोंदणी, अर्ज वाटप सुरू आहेत. पहिल्या दिवशी १८७ जणांनी अर्ज नेले होते, तर आतापर्यंत साडेसहाशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. अर्जवाटप प्रक्रिया पाच मार्चपर्यंत चालणार आहे. सध्या अर्ज वाटप आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर कोणाला कोणत्या वॉर्डातून संधी द्यायची हे निवड समिती 
ठरवणार आहे. 
हे वाचलंत का? - औरंगाबाद मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी हर्षवर्धन जाधव, दाशरथे

पक्षातील वरिष्ठांच्या मुलांच्या तिकिटासाठी फिल्डिंग 
शहरात पक्षाचे संघटन चांगलेच मजबूत झाले आहे. या संघटनासाठी प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत आहे. किमान महानगरपालिकेचे तिकीट आपल्याला मिळेल, या आशेवर संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नजरा आता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे लागल्या आहेत; मात्र पक्षात काही जागांवर वरिष्ठांच्या मुलांसाठीही फिल्डिंग लावण्यात येत असल्याची कुजबुज सुरू आहे. 

भाजपतर्फे शहरातील ११५ जागा लढवण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज वाटप प्रक्रिया सुरू आहे. या उमेदवारांची अर्जांची छाननी करण्यात येईल, त्यानंतर मुलाखती घेऊन ज्यांचे चांगले काम आहे, त्यांनाच संधी देणार आहोत. 
- आमदार अतुल सावे, निवडणूक प्रमुख, भाजप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clarify Party Will Give Chance Only Good Workers Mla atul save