गावात झेंडा लावला म्हणून पेटला वाद, पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीमार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

सिल्लोड-चाळीसगाव रस्त्यावर नेवपूर (ता. कन्नड) फाट्यानजीक काहींनी निळा झेंडा उभारून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावल्याने रविवारी सकाळपासून तेथे तणावाचे वातावरण होते. सोमवारी (ता.सात) सायंकाळी महसूल, पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झेंडा काढल्याचे समजताच गावातील जमावाने पोलिसांवर दगडफेक केली व लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला.

पिशोर (जि.औरंगाबाद) : सिल्लोड-चाळीसगाव रस्त्यावर नेवपूर (ता. कन्नड) फाट्यानजीक काहींनी निळा झेंडा उभारून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावल्याने रविवारी सकाळपासून तेथे तणावाचे वातावरण होते. सोमवारी (ता.सात) सायंकाळी महसूल, पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झेंडा काढल्याचे समजताच गावातील जमावाने पोलिसांवर दगडफेक केली व लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत स्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. आठ) सकाळी ४० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. घटनास्थळी बंदोबस्त असून, तणावपूर्ण शांतता आहे.

एकाच मुलीच्या नावावर दोघांनी दिली बारावीची परीक्षा, अजब बोर्डाचा गजब कारभार

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज सायंकाळी घटनास्थळी पाहणी केली, तर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पिशोर पोलिस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेतली. नेवपूर फाट्यावर शनिवारी रात्री झेंडा लावल्याची माहिती मिळताच पिशोरचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश पवार, पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर अंतरप, सहायक उपनिरीक्षक श्रावण तायडे आदी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना शासकीय जागेवर एका लोखंडी टाकीत सिमेंट- दगड भरून, त्यात लोखंडी पाइप रोवून त्यावर निळा झेंडा, झेंड्याखाली डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा ठेवल्याचे आढळले.

तेथे मोठा जमाव होता. शासकीय जागेवरून झेंडा काढण्याची विनंती पवार यांनी केली. जमावाने विरोध केला. अखेर तेथे बंदोबस्त लावून पवार यांनी वरिष्ठांना माहिती दिली. सोमवारी सकाळी गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आदींची बैठक घेऊन झेंडा काढण्याची विनंती करण्‍यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सायंकाळी उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश सातव हे दंगा नियंत्रण पथकासह तेथे दाखल झाले. तालुका दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बंदोबस्तात विधिवत झेंडा काढण्यात आला. हे समजताच गावातून ४० ते ५० जणांचा जमाव घोषणाबाजी करत, लाठ्या-काठ्या घेऊन व दगडफेक करीत पोलिसांवर धावून आला. मिरची पुडही फेकल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यात धावपळीत काही लोक जखमी झाले.

औरंगाबादहून दिल्लीसाठी आता १५ सप्टेंबरपासून दररोज विमानसेवा

चाळीस जणांवर गुन्हे
सहायक पोलिस उपनिरीक्षक श्रावण तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय जागेवर विनापरवनगी झेंडा लावणे, शासकीय कामात अडथळा, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आदी कलमांखाली ४० संशयितांविरुद्ध आज पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.

 

शासकीय जागेवर, भररस्त्यात झेंडा रोवणे हे कायदेशीरीत्या चुकीचे असल्याचे ७२ तासांचा कालावधी देऊन समजावण्यात आले. समाजाला मिळालेल्या जागेवर झेंडा लावून तणाव कमी करावा, प्रशासनास सहकार्य करावे, अशी वारंवार विनंती करण्यात आली; परंतु झेंडा हटविण्यास विरोध झाल्याने प्रशासनाने कायद्याची चौकटीत राहून झेंडा येथून हटविला आहे.

- जगदीश पवार, सहायक पोलिस निरीक्षक

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clashes Between Police And Some Section Of People Over Flag