स्पीड पोस्टने एखादा लिफाफा तुम्हाला मिळाला आणि तुम्ही विश्‍वास ठेवला तर सावधान

मनोज साखरे
Sunday, 1 March 2020

लिफाफ्याच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधून भामटे लोकांना बक्षीस लागल्याची थाप मारून पैसे भरायला सांगतात. नागरिकाने खात्यात पैसे भरले की मात्र नंतर हे भामटे त्यांचा फोन बंद करून ठेवतात. त्यामुळे नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक होते. गुन्हेगारी बदलता काळ, परिस्थिती, सरकारी योजना, ट्रेंड्‍स याचा अभ्यास करून भामटे लोकांना फसवीत आहेत. 

औरंगाबाद : लॉटरी लागल्याची, कर्ज मिळवून देण्याची थाप मारून आतापर्यंत अनेकजणांना भामट्याने गंडविल्याच्या घटना घडल्या; पण स्पीड पोस्टने एखादा लिफाफा तुम्हाला मिळाला आणि त्यात महागडी कार बक्षीस लागल्याचे लिहिलेले असेल आणि तुम्ही विश्‍वास ठेवला तर? सावधान! या माध्यमातून तुमची लाखोंची फसगत होऊ शकते; कारण अशी मोड्स वापरून भामटे गंडविण्याचे काम करीत आहेत. 

सायबर भामटे नागरिकांच्या फसवणुकीसाठी नवीन क्लृप्त्या लढवितात. अशातच जानेवारी महिन्यात औरंगाबादेत एका नागरिकाला राहत्या घरी स्पीड पोस्टने रजिस्टर केलेला लिफाफा प्राप्त झाला. त्याने लिफाफा उघडला असता ऑनलाइन शॉपिंग कॉन्टेस्ट प्रा.लि.च्या लेटरहेडवर एक पत्र व एक स्क्रॅच कार्ड होते. 

त्यांनी ते स्क्रॅच केले. त्यात त्यांना २१ लाख ३८ हजारांची महागडी चारचाकी जिंकल्याचे नमूद होते. चारचाकीच्या बक्षिसाच्या किमतीवर ४.५ टक्के अर्थात ९६ हजार २१० रुपये कर भरावा लागेल, असे सांगण्यात आले. कराचा भार आणखी कमी करून भामट्याने विश्‍वास संपादन केला, अशी मोड्स वापरून गंडविण्याचे प्रकार सुरू आहेत. 

या लिफाफ्याची माहिती नागरिकाने पोलिसांना दिली. त्यानंतर सायबर पोलिसांकडून या लिफाफ्यातील संपर्क क्रमांक आणि इतर बाबींची इत्थंभूत माहिती घेतली. त्यानंतर हा लिफाफा भामट्याने बिहार, झारखंड येथून भामट्याने पाठविल्याचे निष्पन्न झाले. 

अशा लिफाफ्याच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधून भामटे लोकांना बक्षीस लागल्याची थाप मारून पैसे भरायला सांगतात. नागरिकाने खात्यात पैसे भरले की मात्र नंतर हे भामटे त्यांचा फोन बंद करून ठेवतात. त्यामुळे नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक होते. गुन्हेगारी बदलता काळ, परिस्थिती, सरकारी योजना, ट्रेंड्‍स याचा अभ्यास करून भामटे लोकांना फसवीत आहेत. 

वाचा... 

 विनाअनुदान शाळांना मिळणार अनुदान    

 शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी  

काबाडकष्ट करून मिळविलेले, जपलेले घामाचे पैसे सहजपणे भामट्यांच्या हाती लागत असून, आपला पैसा मेहनतीचा असल्याने तो सहजासहजी दुसऱ्यांच्या हाती पडता कामा नये यासाठीच दक्ष राहण्याची गरज आहे. त्यासाठी सायबर साक्षर होण्याची गरज आता निर्माण झाली आहे. 

काय कराल उपाययोजना 

 1. आपणास जर असे लिफाफे आले तर आपण या लिफाफ्याची पडताळणी करावी. 
 2. लिफाफा संशयित वाटला तर त्याची पोलिसांना माहिती द्यावी. 
 3. आपणास प्राप्त झालेल्या संशयित लिफाफ्यात बक्षीस लागल्याचे नमूद असेल तर आपण त्यातील संपर्क क्रमांकावर संपर्क करू नये. 
 4. जर आपणास भामट्यांचा फोन आला व कार, दुचाकी अथवा विविध भेटवस्तूंच्या संदर्भात त्यांनी बक्षीस लागल्याचे सांगितल्यास आपण यासंदर्भात खात्री करावी. 
 5. आपण भामट्यांची उलट तपासणी करू शकतात. 
 6.  

विश्वास ठेवू नये 
कुठलेही स्क्रॅच कार्ड, बक्षीस लागल्याचे पत्र आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. महागड्या बक्षिसाच्या मोहात पडू नये, पैसे भरू नयेत. त्याचवेळी आपली संभाव्य फसवणूक होऊ नये, यासाठी दक्ष राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

अशीही फसवणूक 

 • बॅंकेतून अमूक-अमूक बोलतोय, क्रेडिट कार्डची पतमर्यादा संपली, क्रेडिट कार्डवर बक्षीस घोषित झाले अशा नानाविध क्‍लृप्त्या वापरून नागरिकांचे पैसे ऑनलाइन पद्धतीने हडपण्याचे प्रकार सर्रास घडतात. 
 • मदतीचा बनाव करून भामटे आपल्याला भुलवतात. एटीएम सेंटरवर पासवर्ड पाहून नंतर नकळत कार्डची अदलाबदल करतात. 
 • आपण बाहेर पडताच हेरलेल्या पासवर्डचा वापर करून ते एटीएम मशीनद्वारे पैसे परस्पर हडपतात, अशी मोड्‍स वापरून आता गंडविण्याचे प्रकार बहुतांश एटीएम सेंटरवर होत आहेत. 
 • हरियानाच्या भामट्यांनी अशा प्रकारे २०१६ मध्ये तीनवेळा, तर २०१७ मध्ये तब्बल अकरा वेळा नागरिकांना गंडवल्याचे समोर आले आहे. 
 • तरुणीच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून अनेकांना फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठवायची. फेक अकाउंटद्वारे चॅटिंग करायची. ओळख वाढवून ब्लॅकमेलिंग, फसवणूक करतात. 
 • नायजेरियन व्यक्तीनेही शहरातील एका शिक्षक महिलेशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून नंतर मैत्री वाढवली व मनी लाँडरिंगच्या नावाखाली तिला ब्लॅकमेल करून लाखो रुपये हडपले होते.  
 • वाचा...   

अडगळीच्या वर्गखोलीत सापडली  रसायनशास्त्राची प्रश्‍नपत्रिका! 

दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत हलगर्जीपणा  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Closed Envelope Fraudulent By SpeedPost Aurangabad News