कंपन्यांना मिळेनात ॲप्रेन्टीससाठी विद्यार्थी, कोरोनाचा फटका

संदीप लांडगे
Friday, 18 December 2020

दरवर्षी औरंगाबादमधील शेंद्रा व वाळूज-पंढरपूर एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये आठ ते दहा हजार विद्यार्थी ॲप्रेन्टीसशीप करण्यासाठी अर्ज करतात.

औरंगाबाद : दरवर्षी औरंगाबादमधील शेंद्रा व वाळूज-पंढरपूर एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये आठ ते दहा हजार विद्यार्थी ॲप्रेन्टीसशीप करण्यासाठी अर्ज करतात. यंदा कोरोना लॉकडाऊनमुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने एकाही विद्यार्थ्याचा निकाल लागलेला नाही. परीणामी, गरज असताना एमआयडीसीतील कंपन्यांना आता ॲप्रेन्टीसशीपसाठी विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. दरवर्षी आयटीआयच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी एक वर्ष ॲप्रन्टींसशीप करण्यासाठी एमआयडीसीतील विविध कंपन्यांकडे अर्ज करतात.

 

 

यामधून विद्यार्थ्यांना कंपनीत कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळून मानधनही मिळते. कंपन्यांना देखील या शिकाऊ विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांचा फायदा घेतात. काही होतकरु मुलांना या कंपन्या कायमस्वरुपी नोकऱ्या देतात. औरंगाबाद जिल्ह्यातून दरवर्षी दीड हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये ॲप्रेन्टीसशीप करतात. मात्र, यंदा २३ मार्चपासून कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा घेता आल्या नाहीत. त्यात आयटीआयचे फक्त प्रॅक्टिकल झाले असून थेअरी बाकी आहे.

 

 

त्यामुळे यंदा आयटीआयच्या मुलांनी ॲप्रेन्टीसशीपसाठी कंपनीकडे अर्ज केलेले नाहीत. राज्यात लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय यांच्यावर विपरित परिणाम झाला होता. परंतु सध्या उद्योग-व्यवसाय पूर्ववत सुरु होत आहेत. सध्या कंपन्यांना आयटीआय ॲप्रेंन्टीशीप करणाऱ्या मुलांची गरज पडत आहे. मात्र, गरज असतानाही सध्या कंपनीला ॲप्रेन्टीसशीपसाठी विद्यार्थी मिळालेले नाही. परंतू, ज्या विद्यार्थी मागील एक दोन वर्षात आयटीआयमधून उत्तीर्ण झाले होते. त्यातील चारशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कंपनीकडून नोकऱ्या देण्यात आल्या असल्याचे आयटीआयचे प्राचार्यांनी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Companies Not Get Students For Apprenticeship Aurangabad News